भोपाळ : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशिरा बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 20 मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. नाराज असलेले काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड पुकारलं. (Madhya Pradesh Ministers Resign)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर कमलनाथ आपला दिल्ली दौरा अर्ध्यावर सोडून भोपाळला रवाना झाले होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वातील 17 आमदारांच्या गटाशी संपर्क होत नव्हता. रात्री दहाच्या सुमारास कमलनाथ यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. त्यावेळी 20 मंत्र्यांनी आपले ‘ना’राजीनामे कमलनाथांकडे सोपवले.
दरम्यान, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप अनैतिक मार्ग अवलंबत असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. मात्र आपण तसं होऊ देणार नाही, अशी शाश्वतीही कमलनाथ यांनी दिली.
“आम्ही राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा.” अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशातील नाट्यमय घडामोडींनंतर वनमंत्री उमंग सिंघार यांनी ‘पीटीआय’ला दिली. मंत्र्यांसह बरेच आमदार सोमवारी सकाळी बंगळुरुला गेले होते.
आरोग्यमंत्री तुलसी सिलावट, कामगार मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया, परिवहन मंत्री गोविंदसिंग राजपूत, महिला आणि बालविकास मंत्री इमरती देवी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रद्युम्नसिंग तोमर आणि शालेय शिक्षणमंत्री डॉ. प्रभु चौधरी या सहा जणांचे फोनही स्विच्ड ऑफ आहेत. (Madhya Pradesh Ministers Resign)
हेही वाचा : मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, 25 कोटी देऊन आठ आमदार फोडले, सत्ताधारी काँग्रेसचा आरोप
दरम्यान, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सर्व प्रकाराविषयी मौन बाळगलं आहे. कमलनाथ यांच्याकडे असलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे यावी, अशी सिंधिया यांची मागणी आहे.
All cabinet ministers present in the meeting with #MadhyaPradesh CM Kamal Nath have tendered resignation; all resignations accepted. pic.twitter.com/NOmCz5BAHo
— ANI (@ANI) March 9, 2020
दुसरीकडे, भाजपने मंगळवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराजसिंह चौहान यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड होऊ शकते.
राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे. गेल्या आठवड्यात सत्ताधारी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे 10 आमदार हरियाणा दौर्यावर गेल्यामुळे भाजप आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, परंतु भाजपने हा दावा फेटाळला होता.
Madhya Pradesh Ministers Resign