चेन्नई : महाबलीपूरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दुसऱ्या दिवशीही विविध मुद्द्यांवर द्वीपक्षीय बातचीत केली. कायम हिंदीला प्राधान्य देणारे पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत खेळीमेळीत गप्पा मारल्या. जिनपिंग यांची मंदारिन भाषा आहे. पण महिला आयएफएस प्रियांका सोहनी (IFS Priyanka Sohoni) यांनी ही भाषेची भिंत भेदली आणि विनाअडथळा संवाद (IFS Priyanka Sohoni) सुरु ठेवला.
प्रियांका सोहनी दोन दिवस पंतप्रधान मोदी यांच्यासोबत त्यांची सावली बनून राहिल्या. प्रियांका यांनी जिनपिंग यांच्या मंदारिन भाषेचा अनुवाद हिंदीत केला. तर मोदी जे बोलले त्याचा हिंदीतून मंदारिनमध्ये अनुवाद केला आणि संवाद पुढे नेला. जिनपिंग यांनी अनेकदा मोदींना भारतीय संस्कृती आणि परंपरेविषयी विचारणा केली. यावेळी प्रियांका यांनी मोदींनी हिंदीत सांगितलेल्या माहितीचा अनुवाद मंदारिनमध्ये केला.
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक, पण अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भेटीत प्रियांका यांनी मोलाची भूमिका निभावली. प्रियांका या 2012 च्या बॅचच्या आयएफएस आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा मानही मिळवला. त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहता तत्कालीन परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी बिमल सामन्याल पुरस्काराने प्रियांका यांचा गौरव केला होता.
प्रियांका 2016 पासून चीनमधील भारतीय दुतावासात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातून तिसरी आणि देशातील 26 रँक प्रियांका यांनी मिळवली होती. चीनची राजधानी बीजिंगमधील दुतावासात प्रियांका राजकीय विंगमध्ये कार्यरत आहेत. या विभागात त्या प्रथम सचिव आहेत.
संबंधित बातमी : इम्रान खानला दिवसा तारे दाखवणाऱ्या विदिशा मैत्रा कोण आहेत?