ग्वाल्हेर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई आणि ग्वाल्हेरच्या राजमाता माधवी राजे यांचे 15 मे रोजी निधन झाले. बऱ्याच दिवसांपासून त्या सेप्सिस आणि न्यूमोनिया या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव दिल्लीतील मंत्री सिंधिया यांच्या निवासस्थानी पोहोचविण्यात आले आहे. 16 मे रोजी दुपारी 4 ते 5 च्या सुमारास ग्वाल्हेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. माधवी राजे यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.
माधवीराजे यांचे लग्नापूर्वीचे नाव राजकुमारी किरण राज्यलक्ष्मी देवी असे होते. त्या नेपाळ राजघराण्याशी संबंधित होत्या. त्यांचे आजोबा समशेर जंग बहादूर राणा हे नेपाळचे पंतप्रधान होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांच्याशी 1966 मध्ये त्याचा विवाह झाला. मराठी परंपरेनुसार लग्नानंतर त्यांचे नाव बदलून माधवीराजे सिंधिया ठेवण्यात आले. यापूर्वी त्या राणी होत्या.
30 सप्टेंबर 2001 रोजी त्यांचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे वयाच्या 56 व्या वर्षी उत्तर प्रदेश येथील मैनपुरी जवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माधवी राजे यांना राजमाता म्हणून संबोधले जाऊ लागले. माधवी राजे यांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुलगी चित्रांगदा सिंह अशी दोन अपत्ये आहेत. चित्रांगदा यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याचे तत्कालीन युवराज आणि राजकारणी विक्रमादित्य सिंग यांच्याशी लग्न केले आहे.
सिंधिया कुटुंबियांचे निकटवर्तीय अमर कुटे यांनी आधी माहिती देताना सांगितले की, माधवी राजे सिंधिया यांच्यावर 16 मे रोजी ग्वाल्हेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आहे. कटोरा तालुक्यासमोरील सिंधिया राजवंशाच्या समाधी संकुलात अम्मा महाराज यांच्या छत्री येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. येथे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्यांचे पती दिवंगत माधवराव सिंधिया यांच्या छत्रीपासून 50 मीटर अंतरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधवी राजे यांच्या निधनानंतर राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी, ‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पूज्य माता माधवी राजे सिंधिया यांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी मिळाली. आई हा जीवनाचा आधार आहे, तिचा मृत्यू म्हणजे जीवनाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. दिवंगत पुण्य आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान मिळावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी बाबा महाकाळाकडे प्रार्थना करतो. ओम शांती.’ असे म्हटले आहे.