महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. शिरूर हवेली मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची नांदेडच्या लोहामध्ये आज जाहीर सभा होणार आहे. तर मुंबईच्या तीनही मार्गिकांवर उद्या ब्लॉक असणार आहे. आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
पश्चिम बंगालमधील मथुरापूर जिल्ह्यातील भाजपचे सोशल मीडिया संयोजक पृथ्वीराज नसकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यात कोणाचा आणि कोणत्या हेतूने सहभाग आहे, याचा अंदाज प्रत्येकाला सहज येऊ शकतो, असे पक्षाने म्हटले आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याबाबत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, “ छापेमारी सुरू झाली आहे. भाजपचा नवा कार्यकर्ता मैदानात उतरला. काही हरकत नाही… बघूया.”
दिल्लीत 10 हजार मार्शलना पुन्हा रोजगार मिळणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी म्हटलं आहे. दिल्ली सरकारने नागरी संरक्षण स्वयंसेवकांना परत ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सोमवारपासून नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काम मिळणार आहे.
प्रहारच्या महेश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर महेश चव्हान यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महेश चव्हाण यांची उमेदवारीचा विषय हा न्यायप्रविष्ठ आहे. अशात चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महेश चव्हाण हे शिवसेनेचे संजय राठोड यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपा उमेदवार सई डहाके यांना राजकीय फायदा होतो का? याकडे कारंजा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष आहे.
“मला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. या मतदारसंघात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. उमरखेडमध्ये शेतकरी आत्महत्या करतात, हे बघायला कोणी आलं नाही. त्यांचं कुटुंब काय करतय हे बघायला कोणी आलं नाही. कारण कोणालाच माणसाची किंमत उरली नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार अमित साटम यांचा प्रचार सुरू आहे. अंधेरी पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात प्रचार सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषा असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या प्रचारात कार्यकर्ते म्हणून फिरवल्यामुले उमेदवार साटम यांच्याकडून महामानवांचा अवमान झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.
ड्रग्जमुक्त नाशिकचा वचननामा असल्याचे संजय राऊत म्हणाले. नाशिक ड्रग्जच्या विळख्यात सापडलय. पूर्वी नाशिकची ओळख वेगळी होती. ड्रग्जचा कारखाना नाशिकमध्ये चालतो, इथल्या दुकानांवर ड्रग्ज मिळतो. नाशिकच्या ड्रग्जचं कनेक्शन गुजरातशी असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाची वाट लावण्याचं काम गुजरात करतय. महाराष्ट्राची वाट लावण्याचा काम गुजरात मधील दोन व्यापाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका किराणा मालाच्या दुकानात गांजा आणि देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,पोलिसांनी धाड टाकून जवळपास 1लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.यात 2 किलो तीनशे ग्राम गांजा,देशी, विदेशी दारू आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.संपूर्ण कुटुंबच गांजा आणि दारूची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.
कारंजा विधानसभा मतदार संघातील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. महेश चव्हाण यांची उमेदवारी ची याचिका नागपूर उच्च न्यायालयात असतांना आज त्यांच्या भाजपा प्रवेशाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
लाटकरांच्या इच्छेमुळे मधुरिमाराजेंनी माघार घेतल्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्टीकरण दिले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून मोठा खल झाला होता.
तांदूळ चोरणाऱ्याला कल्याण काळेनी हरवलं नाना पटोले यांचा रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. शिवाजी महाराजांच्या नखासोबत ही यांची तुलना होऊ शकत नाही, असे पटोले म्हणाले.
आमचे सरकार आल्यावर महिलांना दीड हजार नाही तर तीन हजार रुपये देणार आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले…सविस्तर वाचा…
आमचे सरकार आल्यावर महिलांना तीन हजार रुपये महिन्याला रक्कम देणार आहे. तसेच राज्यातील फक्त मुलींनाच नाही तर सर्व मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बारामतीत उभं रहाणार नव्हतो मी शिरुर हवेलीतून उभं रहाणार होतो. तशी चाचपणी करायला लावली होती, असा खुलासाच कुद्द अजित पवार यांनी केलाय.
कोणताही सर्व्हे कामात येणार नाही. जनतेची ही गर्दी पाहून विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे. महायुतीचे सर्व उमेदवारांना आपण विजय करावे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
हरियाणातील जनतेने काँग्रेसला पराभूत केले. त्याबद्दल हरियाणातील जनतेचे आभार. आता महाराष्ट्रातील जनता त्यांना पराभूत करणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी अकोल्यात बोलताना सांगितले.
“आमचं सरकार पुन्हा येऊन काही महिने झालेत. 70 वर्षांवरील वृद्धांच्या औषधांच्या खर्चाची चिंता करु नका. हा त्यांचा मुलगा आहे. औषधांचा खर्च मोफत करणार. कोणता गरीब झोपडपट्टीत दिसल्यास सांगा. त्यांना घर बांधून देणार. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा.
“2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला आशिर्वाद दिला. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याच सुख मला मिळालं. गरीबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांच घराच स्वप्न साकार होणार. वाढवण बंदर हे देशातील मोठ बंदर असणार. त्यासाठी 80 हजार कोटी रुपये दिलय” अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा.
“पंतप्रधान मोठा उद्योग देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते. त्यांचा कार्यकाळ संपला, पण मोठा उद्योग काही आला नाही. महाराष्ट्र गुजरातला त्यांनी आंदण दिला आहे. गुजरातचे मांडलिकत्व यांनी घेतले आहे. आता त्यांना याची शिक्षा देण्याची वेळ आहे. या सर्व गोष्टींचे प्रायश्चित्त त्यांना देण्याची वेळ आहे” अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोलामध्ये जाहीर सभा. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील महायुतीच्या 15 उमेदवारांसाठी मोदींची जाहीर सभा. नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, प्रफुल पटेल, आनंदराव अडसूळ यांची उपस्थिती. अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन.
आदित्य ठाकरेंकडून वरळीत जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्त्यांनी वरळीत गर्दी केली आहे. महाराष्ट्र महाविकासाआघाडीला साथ देणार, अशा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. मनसेला निवडणुकीच्या दोन महिने आधी जाग येते, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली
निलेश राणे हा त्यांचा मुलगा असल्याने त्यांना सरस वाटतोय. खासदार असताना त्यांच्या मुलाने काय दिवे लावले? दुसऱ्याचा तो कारटा आणि आपला तो बाबू अशी राणेंना नेहमीच सवय आहे. मी काही तरी केलय म्हणूनच तुम्हाला दारोदारी फिरावं लागतय. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व मी करतोय. त्यामुळे माझाच विजय होणार आहे. कोरोना काळात तुम्ही कुठे होता?येणाऱ्या निवडणुकानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल एवढं निश्चित आहे, असे वैभव नाईक म्हणाले.
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सुरेश वरपूडकर यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्याशी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली. सुरेश वरपूडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
भिवंडीत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश केला आहे. रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. भिवंडीचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला. ठाकरे गटाने उमेदवारी नाकारल्याने म्हात्रे नाराज झाले होते. ही नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले.
नरडाणा गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ सभेचा आयोजन… सभेला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांची उपस्थिती..
रांची आणि जमशेदपूरमध्ये ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू.. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी… सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी.. घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती.. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु… विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने राजकारण तापण्याची शक्यता…
पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा, आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील महायुतीच्या 15 उमेदवारासाठी मोदींची जाहीर सभा.. नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, प्रफुल पटेल, आनंदराव अडसूळ यांची उपस्थिती… मोदींच्या जाहीर सभेसाठी तीन लाख चौरस फुटावर डोम मंडमची उभरणी तर 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था…
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात निवडणूकीत रंगत येऊ लागली आहे. संजय काका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळमध्ये प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. गावोगावी भेटीगाठी घेऊन घड्याळाचे नाव मतदान करा, असं आवाहन संजय काका करत आहेत. तर संजय काका पाटील यांच्या पक्षातही तालुक्यातील अनेक जणांनी प्रवेशही केला आहे.
राज ठाकरे जे बोलतात. त्याची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहितात. राज ठाकरे बोलले तिथे गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढली जात आहे. भाजपच्या नादी लागलेला माणूस, दुसरं काय बोलणार? राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार असल्याने त्यांना असं बोलावं लागत आहे. ते जरी ठाकरे असले तरी मी राऊत आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला राऊत…, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भोसरी मध्ये शरद पवार गटात इन्कमिंग सुरूच आहे. अमोल कोल्हे आणि उमेदवार अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. याआधी भाजपाचे माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते भीमाबाई फुगे यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शरद पवार गट धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भोसरीमध्ये भाजपचे अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.
भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. आज दुपारी दोन वाजता नांदेडमध्ये सभा सुरु होणार आहे. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. भाजप महायुतीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.