भाजपचे ‘फेक नरेटिव्ह’ हाणून पाडणार, जनतेला सत्य सांगणार, कॉंग्रेसने जाहीर केले 15 प्रवक्ते

| Updated on: Jul 20, 2024 | 8:56 PM

'फेक नरेटिव्ह' हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. भाजपाने या शब्दाला अक्षरश: जन्म घातला आहे. लोकसभेतील अपयशाला कॉंग्रेसचे फेक नरेटिव्हचा जबाबदार असल्याचा आरोप भाजपा करीत आली आहे. आता सत्ताधाऱ्यांचं फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेसने खास टीम नेमली आहे.

भाजपचे फेक नरेटिव्ह हाणून पाडणार, जनतेला सत्य सांगणार, कॉंग्रेसने जाहीर केले 15 प्रवक्ते
Congress Maharashtra team
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

देशात लोकसभा निवडणूकीतील भाजपाच्या कामगिरीनंतर देशात एक ‘फेक नरेटिव्ह’ हा शब्द खूपच गाजत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर अबकी बार 400 पार केल्यानंतर घटना बदलणार अशी वक्तव्य केली होती. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी असे काही होणार नसल्याचा दावा केला. परंतू त्यानंतर कॉंग्रेसने हा प्रचाराचा मुद्दा बनविला. त्यानंतर भाजपाचा चौखूर उधळलेला अश्वमेध रोखला गेला. त्यामुळे घटक पक्षांचा आधार घ्यायची वेळ पक्षावर आली. त्यानंतर भाजपाने कॉंग्रेसने घटना बदलणार असे फेक नरेटिव्ह पसरवल्याने आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याचा दावा भाजपा नेत्यांनी करायला सुरुवात केली. परंतू आता प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाचे फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी नवीन टिमच जाहीर केली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून ‘फेक नेरेटिव्ह’ पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे.आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो,व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात ‘फेक न्यूज’ पसरवित आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 15 नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत या टिममध्ये ?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा यांना आता कॉंग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची जबाबदारी दिली आहे. पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमाशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्याची कामगिरी हे करणार आहेत. यांच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि संघटक नाना गावंडे यांनी दिली आहे.