Maharashtra Flood कोल्हापूर/ सांगली : महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली (Maharashtra Flood) शहरात पावसाची रिपरिप सुरुच आहे पण प्रमाण काहीसं कमी आहे. मात्र अजूनही अनेकजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे बचावकार्यही वेगाने सुरु आहे. सकाळी 8 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 52.2 इंच इतकी आहे. तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 56 फूट 8 इंचांवर आहे.
पंचगंगेची धोका पातळी 43 फूट आहे, त्यामुळे अजूनही पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षा जवळपास 10 फुटावरुन वाहत आहे. तर कृष्णा नदीची धोका पातळी 45 फूट असून ती सुद्धा 10 फुटांपेक्षा जास्त उंचीवरुन वाहत आहे. त्यामुळे दोन्ही शहरात महापुराची स्थिती गंभीरच आहे. शहरात दूध, पेट्रोल-डिझेल, वीजपुरवठा नाही. पाणी पुरवठा करणारे पंप पुराच्या पाण्यात आहेत, त्यामुळे पिण्याचं पाणी नाही. मोबाईलला नेटवर्क नाही, अशी बिकट अवस्था कोल्हापूर आणि सांगलीकरांची झाली आहे.
सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना ऑनलाईन मदत कशी कराल?
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये 2 लाख 52 हजार 813 लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांच्या राहण्याची सोय, अन्न आणि कपडे यांचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल .तसे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत, असं महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं.
सर्वाधिक चिंता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. पाणी, वीज पुरवठा अद्याप विस्कळीतच आहे. इंधनाची समस्या अधिक वाढली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज आणखी एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्याला 25 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
पंचगंगा नदीच्या पात्राजवळील उपनगराला महापुराचा मोठा फटका बसला आहे. या उपनगरातील लोकांची कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सातशे ते आठशे लोकांना याठिकाणी आश्रय देण्यात आला आहे. या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
दुसरीकडे भयंकर पूरपरिस्थिती असतानाही अनेकांनी आपली घरं सोडली नाहीत. कोल्हापूरजवळील आंबेवाडी आणि चिखली ही गावं पूर्ण बुडाली आहेत. पण तरीही गावातील अनेक नागरिक अजूनही घरात बसून आहेत. आमची जनावरं असल्यामुळे आम्ही त्यांना सोडून जाऊ शकत नाही. जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत आम्ही घर सोडणार नाहीत अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.
दूध पुरवठ्यावर परिणाम
मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये दररोज 90 लाख लिटर दुधाची गरज आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये 45 ते 50 लाख लिटर आवक होत आहे. यामुळे दूध टंचाई निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली या दूधपट्ट्यात दूधसंकलन बंद केलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरांना बसत आहे. याशिवाय महामार्गही बंद असल्याने दुधाचे टँकर रस्त्यावर अडकून पडले आहेत.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे परिसरातून दूध मोठ्या प्रमाणात मुंबईत विक्रीसाठी येत असते. गुजरातवरून अमूल दूध विक्रीसाठी येत असते. पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. तीन दिवसापासून संकलन पूर्णपणे थांबले आहे.
संबंधित बातम्या
अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, केरोसिन मोफत मिळणार
सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना ऑनलाईन मदत कशी कराल?
Kolhapur Flood | 2 लाख घरात वीज नाही, मोबाईल नेटवर्क गायब, हवाईमार्गे इंधन पुरवठ्याची तयारी