मुंबई : राज्य सरकार गृहनिर्माण धोरणात (housing policy) मोठे बदल करण्याची शक्यता आहे. नव्या धोरणानुसार सरकारी योजनांमध्ये एकदा घर मिळाल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही. म्हणजेच एक व्यक्ती एक घर, अशी योजना आणण्याची तयारी सरकारची आहे. त्यानुसार म्हाडा, सिडको किंवा केंद्रीय योजनांमध्ये बदल लागू झाल्यास, एकदा घर मिळाल्यावर, दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये घरासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.
सरकारी योजनांमध्ये एकदा घर मिळूनही अनेकजण अनेकवेळा अर्ज करतात. परिणामी वर्षानुवर्षे घरासाठी वाट पाहणाऱ्यांना घरापासून वंचित राहावं लागतं. अनेकांनी म्हाडा, सिडको लॉटरीमध्ये घरे मिळाली असूनही, पुन्हा-पुन्हा अर्ज केल्याचं पाहायला मिळतं.
शिवाय एका विभागातील सोडतीत घर मिळालं, तरी दुसऱ्या विभागातही अर्ज केला जातो. जसे पुण्यातील गृहनिर्माण योजनेत घर मिळालं तरी मुंबईत किंवा महाराष्ट्रातील अन्य योजनांसाठी अर्ज केला जातो.
जर नवं धोरण लागू झालं तर यावर बंदी येऊन, गरजवंतांपर्यंत सरकारी गृहनिर्माण योजना पोहोचतील, अशी सरकारची धारणा आहे.
मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांची प्रतिक्रिया
“सरकारच्या बदलाबाबत अद्याप माहिती नाही. नवा बदल नक्कीच आम्हाला समजेल. जर सरकार असा कोणता बदल करणार असेल, तर तो निर्णय नक्कीच स्वागतार्ह असेल. कारण जर एखाद्याची पुण्याला जागा असते आणि पुन्हा मुंबईत अर्ज केला जातो. त्यामुळे खरोखरचे गरजवंत मागे पडतात. त्यामुळे सरकारने जर असा निर्णय घेतला तर मी अभिनंदन करतो”, असं मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण म्हणाले.
संबंधित बातम्या
म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी ऑगस्ट महिन्यात लॉटरी