मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार युनिट वापरानुसार राज्य सरकार ग्राहकांना दिलासा देणार आहे. (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill)
या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. 2019 मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. (उदा. जर गेल्यावर्षी तुम्हाला 500 रुपये वीज बिल आले असेल आणि यंदा लॉकडाऊन काळात जर 2000 रुपये विजेचे बिल आले असेल, तर तुम्हाला फक्त 500 रुपये भरावे लागणार आहे)
राज्य सरकार 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 80 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला केवळ 80 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 20 युनिटचे बिल हे राज्य सरकार भरणार आहे.
याच पद्धतीने जर विजेचा वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या 50 टक्के भार हा राज्य सरकार उचलणार आहे. त्याशिवाय जर वीज वापर हा 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे.
दरम्यान लॉकडाऊन काळात ज्यांनी वीज बिल भरलेले असेल, त्या ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill)
संबंधित बातम्या :
Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या