नाशिक: राज्य सरकारने मंदिरे खुली न केल्यास मंदिरांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करु, या भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यात्मिक आघाडीकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, यावर राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने गुरुवारपासून तुळजापूर येथे अध्यात्मिक आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मंदिरांचे कुलूप तोडण्याचा इशारा देण्यात आल्याने कपालेश्वर मंदिरासह नाशिकमधील इतर देवळांच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Security increases outside temples in Nashik)
राज्य सरकारनं अनलॉकमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, काहीअंशी लोकलसेवा सुरु केली असली तरी राज्यातील मंदिरे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, मंदिरे उघडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका जास्त आहे, हे कारण पुढे करत राज्य सरकारने अद्याप मंदिरे खुली केलेली नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या तुषार भोसले यांनी मंदिरांचे कुलूप तोडण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, राज्य सरकारकडून दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याचा विचार सुरु आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील संकेत दिले होते. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पण थोडा हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकते, असेही त्यांनी म्हटले होते.
मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय : ह.भ.प. सचिन पवार
वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या ‘वारकरी दर्पण’चे संपादक ह.भ.प. सचिन पवार यांनी राज्यातील मंदिरांचे टाळो तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय आहेत. आम्ही टाळ वाजवू, पण टाळे तोडणार नाही. वारकरी नसणाऱ्या माणसांनी वारकरी संप्रदायाबद्दल बोलू नये, असे त्यांनी संबंधितांना सुनावले होते. तसेच काही लोक वारकऱ्यांचा वापर करुन मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही सचिन पवार यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडणार?, राजेश टोपेंनी केलं मोठं विधान
(Security increases outside temples in Nashik)