मुंबई | 19 मार्च 2024 : अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेला मुहूर्त मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सहा जागा मागितल्या होत्या. मात्र, त्यांना चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी जर ही ऑफर नाकारली तर शिवसेना 20, काँग्रेस 18 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा असे हे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिलीय.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 7 मे, चौथ्या टप्प्यात 13 मे आणि पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने याआधी शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोडून महाविकास आघाडीला धक्का दिला होता. तर, लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांना आपल्या गोटात समील करून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे, पवार आणि कॉंग्रेस या तिघांना जोरदार झटका बसला असताना प्रकाश आंबेडकर यांची मदत ही महाविकास आघाडीला पूरक ठरणारी होती. मात्र, प्रकाश आंबेडकर हे सहा जागांवर अडून बसले आहेत. मात्र, त्यांना चार जागा देण्याची तयारी महाविकास आघाडीने दाखविली आहे. तर, हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्षाला देण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडीच्या तीन ते चार जागांचे वाटप शिल्लक आहे. त्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची भूमिका पाहता ते महाआघाडीत सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाही असेही या सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांची वाट न पहाता इंडिया अलायन्सच्या जागावाटपाची घोषणा 21 मार्च रोजी मुंबईत केली जाईल असे या सूत्रांनी सांगितले. तसेच, अर्धा डझनहून अधिक जागांसाठी सातत्याने दबाव आणणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या दबावाला महाविकास आघाडीतील पक्ष बळी पडणार नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.