Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

| Updated on: Jun 12, 2020 | 2:32 PM

राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू महाराष्ट्र व्यापण्याकडे कूच करत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. (Maharashtra Monsoon rain update)

Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस
Follow us on

मुंबई : राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू महाराष्ट्र व्यापण्याकडे कूच करत आहे. तळकोकणाच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. तिकडे मराठवाड्यातील परभणीतही विक्रमी पाऊस झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्गात कालपासून सतत पाऊस पडत असून या पावसाचा किनारपट्टी भागात मोठा जोर आहे. (Maharashtra Monsoon rain update)

देवगड तालुक्यात पावसाचा जोर अधिकच असून मागील 24 तासात देवगडमध्ये 140 मिमी पाऊस पडला. या पावसाने दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीला पूर आला असून नदीच्या आसपास सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे या पुलावरुन जाणार दहीबाव-आचरा रस्ता बंद झाला आहे.

परभणीत विक्रमी पाऊस
परभणीत काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावालगत असलेला ओढ्याला पूर आला. पुराच्या पाण्याने कुपटा गावाचा 8 तास संपर्क तुटला होता. त्याचप्रमाणे पुलाचा बराचसा भाग खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला. मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस जोरदार बरसला. या पावसाची नोंद 33.64 इतकी झाली. या पावसाने ओढे, नाले ओसांडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

परभणी शरासह जिल्ह्यात 8 दिवसानंतर सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. हा पाऊस मोसमी असल्याचा समज अनेकांनी करुन घेतला. त्यामुळे जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, 14 जूननंतर जेव्हा प्रत्यक्ष मोसमी पावसाला सुरुवात होईल, तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यात पाऊस
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस बरसला. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली. औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर धो धो पाऊस बरसला. पैठण, औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सकाळच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतली.

अकोल्यात पहाटे 3 पासून 5 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने 9 ते 12 जून दरम्यान जोरदार पाऊस वर्तविल्या नुसार,रात्रीच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. पहाटे सकाळी 3 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर वाढला आणि 4 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

जालन्यात मुसळधार पावसाला सुरुवात
तिकडे जालन्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जालना शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे.

अमरावतीत जोरदार पाऊस

अमरावती शहरात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकायला आणलेला हजारो क्विंटल भुईमूग आणि गहू पाण्यात भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता अवघ्या काही दिवसांवर पेरणीचा हंगाम येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणण्यासाठी बाजार समितीत मोठी गर्दी केली आहे.

वर्धा जिल्ह्यात पाऊस

वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. रात्री आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. वर्धा , सेलू , देवळी , हिंगणघाट , समुद्रपूर , आर्वी तालुक्यात मुसळधार तर आष्टी, कारंजा तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात सगळीकडे पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.

(Maharashtra Monsoon rain update)