मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झाली असून त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. (Maharashtra Situation after partial lock down)
मुंबईचा कणा मानली जाणारी लोकलही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मालगाडी वगळता संपूर्ण देशभरातील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यासोबत मोनो, मेट्रो, एसटी बस, खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरील देशातून येणारी आणि जाणारी विमानसेवाही बंद करण्यात आली आहे.
राज्यात केवळ अन्नधान्य, भाजीपाला, किराणा माल, दूध, मेडिकलचे दुकान, रुग्णालये, दवाखाने, बँका यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्याचप्रमाणे, वैद्यकीय, वाहतूक, महापालिका, पोलीस, सुरक्षा दल, विद्युत, इंटरनेट, पेट्रोलियम बँकिंग, आयटी, मनुष्यबळ, मीडिया अशा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ ओळखपत्र दाखवून बेस्ट किंवा सरकारी बसने प्रवास करता येईल. अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला सुरुवातीपासूनच दिला जात आहे.
शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे आधीच्या सूचनेनुसार थिएटर, नाट्यगृह, मॉल, जिम, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, मंदिरेही महिना संपेपर्यंत बंद राहतील. खाजगी कार्यालय आणि कंपन्याही पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर सरकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीही पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे. (Maharashtra Situation after partial lock down)
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाला थांबवण्यासाठी वृत्तपत्राची वितरण आणि विक्री थांबवण्यात आली आहे . वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते, डेपोधारक,वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी, वृत्तपत्र टाकणारी मुलं ही सर्व सहभागी असतात. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाजास्तव वितरण थांबवण्यात येत आहे.
Curfew to remain imposed in Pune, Maharashtra till March 31. All establishments excluding emergency services & essentials to remain closed in city during this period. Any offender shall be punished under section 188 of Indian Penal Code: Pune Police #COVID19 https://t.co/duGd8s91MJ
— ANI (@ANI) March 22, 2020
दरम्यान, राज्यात रक्ताची कमतरता असल्यामुळे गर्दी न करता रक्तदान करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान जरुर करावे. (Maharashtra Situation after partial lock down)