नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके वाहून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले असून शेलगावसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरले असून विष्णूपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले. मागील 24 तासात जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज पहाटे (7 सप्टेंबर) जिकडे तिकडे चोहीकडे पाऊसाच्या धारा आणि पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक अर्धापूर महसुल मंडळात 123 मिलीमीटर तर भोकर 105 मिलीमीटर, मनाठा 104 मिलीमीटर, तळणी 97 मिलीमीटर, पिंपरखेड 84 मिलीमीटर, आष्टी 77 मिलीमीटर, धर्माबाद आणि शेवडी प्रत्येकी 75 मिलीमीटर, तामसा 72 मिलीमीटर, हिमायतनगर आणि निवघा प्रत्येकी 68 मिलीमीटर, किनवट 62 मिलीमीटर, कापशी 58 मिलीमीटर, बिलोली 55 मिलीमीटर, मुखेड 52 मिलीमीटर, कलंबर 47 मिलीमीटर, नायगाव, हदगाव आणि सोनखेड प्रत्येकी 45 मिलीमीटर, कंधार आणि लोहा प्रत्येकी 40 मिलीमीटर, माळाकोळी 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
(maharashtra nanded heavy Rain some Village Loss Contact Vishnupuri Dam overflow)
हे ही वाचा :