मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे (Corona Lockdown restriction violation Crime register in Maharashtra). आतापर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या काळात 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात 22 मार्च ते 27 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार 995 गुन्हे नोंद झाले आहेत. या अंतर्गत 37,044 व्यक्तींना अटक करण्यात आली. 96,430 वाहने जप्त करण्यात आले. यातील विविध गुन्हांसाठी 28 कोटी 51 लाख 62 हजार 564 रुपये दंड आकारण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत, अशीही माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 364 घटना घडल्या. त्यात 895 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. या काळात 100 नंबरवर 1 लाख 13 हजार फोन आले. पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यांमध्ये 24 तास कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1 लाख 13 हजार 335 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच 96 हजार 430 वाहने जप्त करण्यात आली.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने राज्यातील 220 पोलीस आणि 25 अधिकारी अशा एकूण 245 पोलीस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. यात शारीरिक अंतर पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असंही आवाहन यावेळी गृहमंत्र्यांनी केलं.
हेही वाचा :
गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल
सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा : प्रकाश आंबेडकर
व्हिडीओ पाहा :
Corona Lockdown restriction violation Crime register in Maharashtra