महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपचे 132 आमदार निवडून आले. त्यापाठोपाठ शिवसेना 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 41 आणि अपक्ष/मित्रपक्षांना 7 जागा मिळाल्या. आता सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरुन लॉबिंग सुरु झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदासाठी होणाऱ्या लॉबिंगवरुन एक मोठे वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.
“आज लोकशाही मजबूत पायावर उभी राहिली आहे. संविधान आजही अखंड आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी सर्व मानव जातीसाठी घटना दिली आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला देशाचा मालक केले आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.
यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “जेव्हा एका पक्षाचे सरकार असते, तेव्हा त्याच्यांत धुसफूस असते. इथे तर तीन-तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जण मंत्रीपदासाठी आग्रही आहे. प्रत्येक आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ असते. त्यामुळे प्रत्येक आमदार आपापल्या नेत्यांकडे आग्रह करु शकतात. आता त्यावर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील”, असे छगन भुजबळांनी म्हटले.
“संजय राऊतांवर मी काही कमेंट करणार नाही. ते रोज नवीन दावे करत असतात. देवेंद्र फडणवीसांना पक्षांचे ऐकावे लागले होते. थोडे दिवस नाराजी होत असते. पण नंतर त्यांनी काम सुरु केले होते”, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.