‘मैंने प्यार किया’तील अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

| Updated on: Jul 03, 2019 | 5:34 PM

'मैंने प्यार किया' या सिनेमातून आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला गंभीर आरोपाखाली अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक झाली होती.

मैंने प्यार कियातील अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक
Follow us on

मुंबई : ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला गंभीर आरोपाखाली अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक झाली होती. हिमालय दासानी यांच्यावर मुंबईच्या लोखंडवाला परिसरात सट्टा रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

मुंबईच्या अंबोली पोलिसांनी मंगळवारी (2 जून) हिमालय दासांनी यांना अटक केली. त्यानंतर आज त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. दासानी यांच्याव्यतिरिक्त पोलिसांनी इतरही काहींना अटक केली. तसेच पोलीस अनेक संशयितांची चौकशी करत आहेत.

गेल्या महिन्यात अंबोली पोलिसांनी अंधेरी पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलमध्ये धाड टाकली होती. या धाडीदरम्यान 15 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासात दरम्यान हिमालय दासानी यांचं नाव समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आज हिमालय दासानी यांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या संपूर्ण प्रकरणावर हिमालय दासानी, पत्नी भाग्यश्री तसेच कुटुंबाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून भाग्यश्रीला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख मिळाली होती. मात्र, हा सिनेमा हीट होताच 1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय दासानी यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

हिमालय दासानी यांचं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांची दोन मुलं आहेत. अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी असं त्यांच्या मुलांचं नाव आहे. अभिमन्यू हा देखील अभिनेता आहे. 2018 मध्ये ‘मर्द को दर्द नहीं होता’ ही सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिमन्यूच्या अभिनयाचं अनेकांकडून कौतुकही करण्यात आलं होतं.