चंदिगढ : विवाहित शेजारणीला ‘फ्लाईंग किस’ (Flying Kiss) देणं पंजाबमधील एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर मोहालीतील कोर्टाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पंजाबमधील मोहालीत आरोपी आणि तक्रारदार महिला एकाच सोसायटीत राहतात. आरोपी विनोद हा तक्रारदार महिलेच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतो. तो जेव्हा समोर येतो, तेव्हा आपल्याला फ्लाईंग किस देतो, असा आरोप तिने केला आहे.
विनोदला आपण बऱ्याचदा रोखलं, तरीही तो ऐकत नव्हता. इतकंच काय, तर ही गोष्ट पतीच्या कानावर घातल्यानंतर त्यानेही विनोदला समज दिली. मात्र त्याच्या वागणुकीत सुधारणा दिसत नव्हती, असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपीने एकदा आपल्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. विनोदच्या छेडछाड आणि शेरेबाजीने त्रासलेल्या महिलेने अखेर फेज 11 मधील पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, आरोपी विनोदनेही तक्रारदार महिला आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारी ऐकून एफआयआर नोंदवला. मात्र पुरावे न मिळाल्याने कोर्टाने तक्रारदार महिला आणि तिच्या नवऱ्याची निर्दोष मुक्तता केली.
कोर्टाने आरोपी विनोदला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे तीन हजार रुपये दंड भरण्याचे आदेशही दिले आहेत.