लखनऊ : आयपीएलमधील सट्टेबाजीत सर्व पैसे हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने आपल्या तीन मुलींना विष पाजून स्वत: आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील वाराणसीत ही धक्कादायक घटना घडली. दीपक कुमार गुप्ता असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) अशी मुलींची नावे आहेत.
दीपक लक्सा येथे कपडे विकण्याचे काम करत होता. कुटुंबामध्ये दीपकच्या पाश्चात पत्नी आणि तीन मुली निबिया, अद्वितीय आणि रिया होत्या. आयपीएल सामन्यादरम्यान दीपक सलग सट्टेबाजीमध्ये पैसे हरत होता. सट्टेबाजीत हरल्यानंतर दीपक कर्जबाजारी झाला होता. कर्जबाजारीपणाच्या चिंतेमुळे दीपकने आपल्या तीन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. घटनेच्या एकदिवस आधी दीपकची पत्नी माहेरी गेली होती.
ही घटना घडल्यानंतर शेजारील लोकांनी तातडीने या चौघांसह रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारादरम्यान या चौघांचा मृत्यू झाला. “दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडण होत असे, यामुळे ती माहेरी निघून गेली होती”, असं शेजारील लोकांनी सांगितले.
“काकाच्या तिन्ही मुली आंगणात झोपलेल्या होत्या. काहीवेळाने काका आले आणि त्यांना घरात घेऊन गेले. यानंतर ते दीदीच्या रुममध्ये जाऊन टीव्ही पाहत होते. यानंतर काकाची छोटी मुलगी रियाने आजीला सांगितले की, बाबांनी आम्हाला काहीतरी पाजले आहे. यावेळी आजी रुममध्ये गेली आणि तिघींना बाहेर घेऊन आली, असं दीपक कुमार गुप्ताच्या भाचीने सांगितले.