बारामती : संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस अटकेची कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली आहे. (Manohar Bhosale is in the custody of Pune Police)
मनोहर मामा भोसले विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याप्रकरणी कलम 376 2 n, 376 d, 354 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. मनोहर मामाच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे.
विशेष म्हणजे मनोहर मामा यांच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमांमाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.
याप्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. सध्या ते फरार असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :
Manohar Bhosale is in the custody of Pune Police