Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद, मराठा नेते आक्रमक

| Updated on: Sep 23, 2020 | 4:35 PM

येत्या 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (Maratha Community Announcement Maharashtra Bandh For Reservation)

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद,  मराठा नेते आक्रमक
Follow us on

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा नेत्यांनी केली आहे. आज (23 सप्टेंबर) झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. (Maratha Community Announcement Maharashtra Bandh For Reservation)

कोल्हापुरात आज गोलमेज परिषद पार पडली. यावेळी 15 ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोलमेज परिषदेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी बंदची हाक दिली. “आमच्या ठरावाची प्रत राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही पाठविण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही बंद मागे घेऊ,” अन्यथा 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

”पुढच्या काळात ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत राज्यभर आंदोलन चालू राहील. राज्य सरकारने वेगवेगळ्या विभागात 1260 कोटी रुपये देऊ, अशी घोषणा केली आहे. कालच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने 1206 कोटी रुपये कसे आणि कधी देणार आहेत, याचा खुलासा करावा. याआधीही अनेकवेळा आम्ही अशा प्रकारच्या घोषणा ऐकल्या आहेत. सरकार फक्त घोषणा करतं पण बजेट नाही, अधिवेशनात तरतूद नाही. कोरोनामुळे सध्या आरोग्य खात्यात पैसे नाहीत, अशा अनेक गोष्टी आम्हाला यापूर्वी ऐकायला मिळालेल्या आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. (Maratha Community Announcement Maharashtra Bandh For Reservation)

”नोकरभरतीला सरकार कधी स्टे देणार आहे? मराठा समाजाच्या मुलांची 2020-21 सालाची फी परतावा सरकार कशी देणार आहे? त्याचबरोबर शिवस्मारकाचं काम कधी सुरु करणार? या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी किंवा राज्य सरकारने मीटिंग न बोलवता करावा. स्वत: 9 ऑक्टोबरपर्यंत या सगळ्या घोषणांची पूर्तता कशी करणार हे त्यांनी मुंबईत बसून स्पष्ट करावं. त्यातून आमच्या मनाला समाधान वाटलं तर महाराष्ट्र बंदची घोषणा मागे घेऊ. पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज 10 ऑक्टोबरला रस्त्यावर येईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

चर्चेला बोलावू नका

”आमचा बंद शांततेत राहील. पण आमचा अंत पाहू नका. आम्ही सरकारला आमचे 15 ठराव पाठवत आहोत. त्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने आम्हाला बोलावू नये. तर त्यावर निर्णय घ्यावा. आमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका,” अशी कळकळीची विनंतीही त्यांनी सरकारला केली.

…तर थोबाड फोडो आंदोलन

”आम्ही बंदची हाक दिली आहे. त्याआधीच सरकारने या ठरावांची अमलबजावणी करावी. नाही तर 10 तारखेनंतर आम्ही थोबाड फोडो आंदोलन करू,” असा इशारा विजयसिंह महाडिक यांनी दिला.

गोलमेज परिषदेतील 15 ठराव

1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच

2. मराठा समाजाच्या मुलामुलींना शासनाकडून चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा मिळावा

3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा

4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी

5. सारथी संस्थेसाठी 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी

6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी

7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी

8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत

9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी

10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे

11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी

12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे

13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी

15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी (Maratha Community Announcement Maharashtra Bandh For Reservation)

संबंधित बातम्या :

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच, गोलमेज परिषदेत 15 ठराव मंजूर