कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : गणेशोत्सव (Ganeshostav) म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा सण महाराष्ट्रासह देशभर उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही मराठी कुटुंब (Marathi Family) हे कामासाठी देशाबाहेर वास्तव्य करत आहेत. तेथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी कुटुंबातील बालकांना गणेशोत्सवाची माहिती पटवून त्यांना त्याची खरी मजा चाखता यावी म्हणून ऑस्ट्रेलियातही अनेक मराठी कुटुंबांनी आपल्या घरी बाप्पाचं आगमन केलं आहे.
ऑस्ट्रेलियात (Australia) विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. महाराष्ट्राप्रमाणेच येथेही दीड दिवसाचा, 5 दिवसाचा आणि अनंत चतुर्दशी पर्यंतचा गणपती असतो. मेलबर्न शहरातील विविध परिसरात गेल्या 10-20 वर्षात बरेच मराठी कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत आणि ते येथे विविध मराठी सण-वार साजरे करतात. त्यातील गणपती उत्सव हा सर्वात जास्त आनंददायी महोत्सव आहे.
मेलबर्नच्या दक्षिण पूर्व भागातील रुपाली आणि गणेश किरवे यांच्या राहत्या घरी गेल्या 8 वर्षापासून हा सण साजरा केला जातो. जरी हा गणपती घरगुती असला तरी त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप देण्यात आलं आहे. गणेशोत्सवापूर्वी ते विसर्जनापर्यंत त्यांच्या घरी ऑस्ट्रेलियातील अनेक मराठी कुटुंब भेट देत असतात.
विशेष म्हणजे येथे शुक्रवार-शनिवार आणि रविवारच्या आरत्यांना खरी मज्जा असते. यावेळी येथे अनेकजण उपस्थित राहतात.
त्याचप्रमाणे प्राजक्ता आणि अभय कांबळे यांच्या Hampton पार्क येथील घरी मागील 8 वर्षांपासून आणि वाघुले कूटुंबीय यांच्याकडे गेल्या 4 वर्षांपासून गौरी-गणपती असतात.
याव्यतिरिक्त मानसी आणि सचिन कडवे यांच्याकडे 7, तर सोनाली आणि संदीप चोपडे यांच्या घरी सुद्धा 3 वर्ष गणेशाचे आगमन होत आहे. या उत्सवाचे निमित्त साधून काही ठिकाणी ‘सत्यनारायणा’ची पूजा सुद्धा आयोजित केलेली असते. आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. कोणाच्या घरी कोणत्या दिवशी कार्यक्रम हे आधीच ठरवून घेतलेले असल्याने सर्वांकडे जवळजवळ सर्व समुदाय उपस्थित असतो.