मराठी नाट्य निर्माता संघाकडून ‘पडद्यामागच्या कलाकारांना’ मदतीचा हात!

| Updated on: Nov 06, 2020 | 1:19 PM

सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी मराठी नाट्य निर्माता संघाकडून पडद्यामागच्या कलाकारांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

मराठी नाट्य निर्माता संघाकडून ‘पडद्यामागच्या कलाकारांना’ मदतीचा हात!
Follow us on

मुंबई : सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी मराठी नाट्य निर्माता संघाकडून (Marathi Natya Nirmata Sangha) पडद्यामागच्या कलाकारांना मदतीचा हात देण्यात आला आहे. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, त्याच वेळेस ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत सध्याच्या अडचणींचा विचार करून रंगमंच कामगार संघटनेला व नाट्य व्यवस्थापक संघटना, तसेच बुकिंग क्लार्क यांना अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही तांत्रिक पुर्ततेअभावी संस्थेचे बँक खाते स्थगित होते. परिणामी, अर्थसहाय्य निर्णयाची कार्यवाही होऊ शकली नव्हती (Marathi Natya Nirmata Sangha financial help to backstage artist).

दरम्यान, रंगमच कामगार संघटनेने आपल्या संस्था सदस्यांची संख्या अधिक असल्याने अधिक अर्थ सहाय्याची लेखी मागणी कार्यकारिणीच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहून केली होती. त्यावर पूर्वीप्रमाणे विद्यमान कार्यकारिणीतही सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनुसार, ‘न्यासाच्या व बँकेच्या कागदपत्रांची पुर्तता होताच तातडीने हे अर्थ सहाय्याचे धनादेश काढावे’, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार, संस्थेचे बँक खाते कामकाजासाठी खुले होताच, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

‘मराठी रंगभूमी दिना’चे औचित्य

‘मराठी रंगभूमी दिना’चे (5 नोव्हेंबर) औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर, माटुंगा येथे ‘नाट्य निर्माता संघ’चे अध्यक्ष संतोष काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, ‘रंगमच कामगार संघ’ आणि ‘नाट्य व्यवस्थापक संघ’, पदाधिकारी तसेच बुकिंग क्लार्क यांच्या उपस्थितीत अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले. (Marathi Natya Nirmata Sangha financial help to backstage artist)

या कार्यक्रमाला ‘अ.भा. मराठी नाट्य परिषद’चे अध्यक्ष प्रसाद कांबळी, उपाध्यक्ष नाथाभाऊ चितळे, ज्येष्ठ नाट्य निर्माते अशोक हांडे, संतोष कोचरेकर, ज्येष्ठ कलावंत राजन भिसे आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवारांच्या हस्ते ‘रंगमंच कामगार संघा’चे अध्यक्ष किरण वेल्हे, ‘नाट्य व्यवस्थापक संघा’चे प्रमुख कार्यवाह हरिभाऊ पाटणकर, नितीन नाईक, छोटू आजगांवकर यांच्याकडे अर्थसहाय्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

मदतनिधीचे वाटप

यावेळी रंगमंच कामगार संघाला 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली. तर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने रंगमच कामगारांना लॉकडाऊन काळात, अर्थसहाय्य देण्यासाठी ‘रंगकर्मी मदत निधी’ची निर्मिती करण्यात आली होती. त्यांच्या या कार्याला 5 लाख रुपये मदतनिधी सुपूर्द करण्यात आला. नाट्य व्यवस्थापक संघ आणि बुकिंग क्लार्क यांना एकत्रित असे 1 लाख रुपये धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आले.(Marathi Natya Nirmata Sangha financial help to backstage artist)

रंगमंच कामगार हा नाट्य व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांना अर्थसहाय्य देण्यास उशीर झाला असला तरी, दिवाळीच्या आधी त्यांच्या हाती रक्कम पोहोच व्हावी, अशी भावना नाट्य निर्माता संघाची आहे’, असे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

नाट्यनिर्मितीला शासकीय मदतीची आवश्यकता

‘नाट्यगृहे शासनाने नाट्य प्रयोगांसाठी खुली केली तरी, नाट्य व्यवसाय पुर्ववत उभा राहाण्यासाठी नाट्य निर्मात्याला शासकीय अर्थ सहाय्याची आवश्यकता कशी आहे? त्याबाबत शासनाने आपली भूमिका जाहीर करावी’, अशी मागणी प्रसाद कांबळी यांनी यावेळी केली.

(Marathi Natya Nirmata Sangha financial help to backstage artist)