मावळ विधान सभा : महायुतीत रस्सीखेच,पण लक्ष शरद पवारांकडे का ?

| Updated on: Oct 14, 2024 | 3:47 PM

मावळ मतदार विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा यांच्या गटात गेलेल्या सुनील शेळके यांना तिकीट मिळणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण भाजपाने या मतदार संघावर दावा केला आहे.त्यामुळे महायुतीत या मतदार संघावरुन रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोणावळा येथे केलेल्या सभेत थेट सुनील शेळके यांना आव्हान दिल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ विधान सभा : महायुतीत रस्सीखेच,पण लक्ष शरद पवारांकडे का ?
Sharad pawar and Ajit Pawar
Follow us on

मावळ मतदार संघात महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मावळ विधान सभा मतदार संघात भाजपाने दावा केल्याने अजितदादा गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके अडचणीत आले आहेत. सुनील शेळके यांना महायुतीने तिकीट दिले तर भाजपात दुफळी माजू शकते असे म्हटले जात आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणूका जाहीर होऊ शकतात असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दोन्ही प्रमुख विरोधी आघाड्यांनी बातमी लिहीपर्यंत तरी जागा वाटप जाहीर केलेले नाही. या अनेक मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन शक्तीप्रदर्शन सुरु आहे.

राज्यात विधान सभा निवडणूकांची घोषणा अजून झालेली नाही. तरी महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत मावळ मतदार संघावरुन नोकझोक सुरु आहे. महायुतीतील घटक पक्षांनी जागांबाबत दावे – प्रतिदावे केल्या जागा वाटप सोपे नसणार आहे. हे स्पष्ट झालेले आहे. या अजितदादांकडे असलेल्या मावळ मतदार संघात महायुतीचा मोठा भाऊ भाजपाने दावा केल्याने अजितदादांची मोठी पंचाईत झालेली आहे. त्यामुळे अजितदादा पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा केला आहे. त्यामुळे अजितदादा गटात अस्वस्थता आहे.

विधानसभेत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल त्याच पक्षाचा वाट्याला ती विधानसभा जाईल असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरलेला आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलेले आहे. मात्र असे असताना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा कशाच्या जोरावर करीत आहेत असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. भाजपाने येथे ऑगस्ट महिन्यात मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा नेमकी कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभेत राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला होता. मात्र आता भाजपाने धरलेला आग्रह योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असल्यानं विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत असे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे मावळ येथून आपण उभे राहावे असे शेळके यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा नेमकी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2014 मावळ विधान सभा निवडणूक निकाल

अनुक्रमांक उमेदवाराचे नाव पक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
1सुनील शंकरराव शेळकेराष्ट्रवादी कॉंग्रेस1,67,71267.56%
2बाळा ऊर्फ संजय विश्वनाथ भेगडेभाजपा73,77029.72%

साल 2014 आणि 2019 मध्ये काय झाले ?

साल 2019 च्या विधानसभा निवडणूकात एकसंघ राष्ट्रवादीचे सुनीळ शेळके हे 1,67,712 मतांनी निवडून आले होते. तर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाचे नेते बाळा ऊर्फ संजय विश्वनाथ भेगडे यांना 73,770 मते मिळाली होती. साल 2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचे नेते बाळा ऊर्फ संजय विश्वनाथ भेगडे यांचा 95,319 मते मिळून विजय झाला होता. तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्ञानोबा ऊर्फ माऊली दाभाडे (67,318 मते ) यांना पडली होती.तर तिसऱ्या क्रमांकाची मते कॉंग्रेसच्या किरण शंकर गायकवाड (17,624 मते ) यांना पडली होती.

2019 मावळ विधान सभा निवडणूक निकाल 

अनुक्रमांकउमेदवाराचे नावपक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
1भेगडे संजय (बाळा) विश्वनाथ भाजपा 95,31945.76%
2ज्ञानोबा ऊर्फ माऊली दाभाडेराष्ट्रवादी कॉंग्रेस67,318 32.32%
3किरण शंकर गायकवाड काँग्रेस 17,624 8.46%

कसा आहे मतदार संघ

पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्याला कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघात भौगोलिक विविधतेसोबत सांस्कृतिक विविधता आहे.मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला पगडा आहे.भाजपनेही स्थानिक पातळीवर अलिकडे वर्चस्व मिळविले आहे. तर शेकापची देखील येथे मते आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत हे विशेष..

मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके, तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे भाजपचे आमदार आहेत. तर उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.

भाजपचा बालेकिल्ला

मावळ तालुक्याचा इतिहास पाहिला तर 1957 ला मावळ विधानसभेतून रामभाऊ म्हाळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 1957 ते 2024 या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार जनतेने निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार असल्याचे भाजपाचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मागे म्हटले होते.

आम्हाला संघर्ष करायचा नाही,एकदा महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं? हे लोकसभेला सर्वांनी पाहिलं आहे. आमच्यासाठी महायुती सर्वकाही आहे. मावळ भाजपचा बालेकिल्ला असून यापूर्वी अनेक निवडणुकांत हे सिद्ध झालेले आहे. पुन्हा एकदा मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे बाळा भेगडे यांनी म्हटले होते.

अजितदादांची परीक्षा पाहणारा लोकसभा मतदार संघ

मावळ मतदार संघ पवार कुटुंबातील लढतीमुळे साल 2019 च्या निवडणूकीत चर्तेत राहीला होता. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्राने या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पार्थ यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील मतभेद समोर आले होते. त्यानंतर पुढे राष्ट्रवादीतून फूट पडली. कारण एकसंध शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा लोकसभेत पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला होता.या 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार’ हा मुद्दा महत्वाचा ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नव्हती. पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळी श्रीरंग बारणे यांना निवडून आणल्याचे म्हटले जात होते. तब्बल 2 लाख 5 हजार मतांनी पार्थ पवार यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पराभव करीत दुसऱ्यांदा खासदार निवडून आणले होते.आपल्या मुलाला निवडून आणू न शकल्यामुळे अजित पवार खासे नाराज झाले होते.

शरद पवार करणार करेक्ट कार्यक्रम

अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी फूट पाडण्याचा निर्णय शरद पवार यांनी राजकीय निर्णय म्हणून एक वेळ पाहीला असेल परंतू शरद पवार यांनी जी भाषा घरच्यांबाबत वापरली नाही ती सुनील शेळके यांच्याबाबतीत वापरली होती. शरद पवार यांनी लोणावळा येथे केलेल्या जाहीर सभेत, ‘ तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, तुझ्या अर्जावर माझी सही आहे लक्षात ठेव मी त्या वाटेला जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’ अशी भाषा सुनील शेळके यांच्याबाबत वापरली होती. त्यामुळे सुनील शेळके यांचा विजय सोपा नाही असे म्हटले जात आहे. जर सुनील शेळके यांना तिकीट दिले तर भाजपातील लोकच आपले संघाचे नेटवर्क वापरून त्यांचा पराभव करतील असे म्हटले जात आहे. या मतदार संघात जर भाजपाला जागा सुटली नाही तर यावेळी शरद पवार यांचा उमेदवार निवडून आणायचा म्हणजे पुढील टर्ममध्ये शरद पवार सरकारमध्ये असले तरी भाजपाला पुढील टर्ममध्ये या मतदार संघावर दावा करता येईल अशी भाजपाची रणनीती आहे. भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या सुनील शेळके यांना शरद पवार यांनी खडकवासला येथे निवडणूक निरीक्षक नेमले होते. पक्ष फुटल्यानंतर ते अजितदादा सोबत गेल्याने शरद पवार प्रचंड नाराज झाले. बारामती लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपली सर्व शक्ती शेळके यांनी अजितदादांसाठी वापरल्याचा राग शरद पवार यांना आहे. त्यामुळे जर महायुतीने सुनील शेळके यांना तिकीट दिले तर शरद पवार भाजपाच्या मदतीने शेळके यांचा करेक्ट कार्यक्रम करतील असे म्हटले जात आहे. मावळ येथे शेतकरी आंदोलकांवर गोळीबार झाला होता, तेव्हा अजितदादा पालक मंत्री असताना गोळीबार झाला होता. या आंदोलनात संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. यामुळेही अजितदादांवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राग आहे.

तीन भेगडे आणि एक शेळके

मावळ विधानसभा मतदार संघात सुनील शेळके, रवी भेगडे, बापू भेगडे, बाळा भेगडे या चौघात चुरस असल्याचे म्हटले जात आहे. यात बाळा भेगडे यांनी माघार घेतल्याचे म्हटले जात आहे. बापू भेगडे हे अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे बापू भेगडे हाती तुतारी घेऊ शकतात. परंतू बापू भेगडेंना तिकीट दिल्यास भाजपाची परंपरागत मते मिळणार नाहीत हे शरद पवार यांना पुरते ठाऊक आहे. या उलट रवी भेगडे यांना समोर केल्यास सुनील शेळके की रवी भेगडे यात रवी भेगडे हे भाजपाची मते मिळून ते निवडून येऊ शकतात. बापू भेगडे आणि बाळा भेगडे यांची ताकद मिळून या चौघांपैकी रवी भेगडे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.