कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आज चांगलीच राडेबाजी पाहायला मिळाली. नगरसेवकांव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला महापालिकेत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. भाजपने तांत्रिक मुद्दे काढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे संख्याबळ असूनही, धाकधूक वाढली होती. महापौर निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेत आले. मात्र यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली.
सुरज गुरव म्हणाले,”गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही. सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”
संबंधित बातमी – नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं
कोण आहेत सुरज गुरव?
उपअधीक्षक सुरज गुरव यांचा परिचय
सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी आहेत
सुरज गुरव 2013 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले.
नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं.
त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली
त्यानंतर सुरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले.
शाहूवाडीनंतर ते सध्या करवीर पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत
सध्या कोल्हापूर शहर प्रभारी उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे.
कोल्हापूर महापौर निवडणूक
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर-उपमहापौर निवडणूक झाली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर भाजपने तांत्रिकदृष्ट्या तगडं आव्हान दिलं होतं. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु होती. तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले होते. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होताना दिसत होतं. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे रिंगणात होत्या, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांना मैदानात उतरवण्यात आलं . मात्र पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश आजच येण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली होती. कारण या पाच नगरसेवकांमध्ये 4 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आणि एक भाजपचा होता.
पाच नगरसेवक अपात्र ठरले असते तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असती. दुसरीकडे शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपद भाजपकडे खेचण्यासाठी शड्डू ठोकला असला, तरी भाजपसाठी ही लढाई तितकीशी सोपी नव्हती. पण भाजपने मंत्रालयातून ताकद लावल्याचा आरोप होत आहे. सध्या महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ता आहे.
सध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी 44 तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33, आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. मात्र अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे सर्व पक्षांचं गणित बिघडणार आहे.
कोल्हापूर महापालिका एकूण जागा – 81
*काँग्रेस-राष्ट्रवादी – 44, दोन अपात्र (राष्ट्रवादी) – 42, चार अपात्र ठरल्यास – 38
*भाजप-ताराराणी – 33, एक अपात्र ठरल्यास – 32
*शिवसेना – 4 तटस्थ राहणार आहेत.
* त्यामुळे उर्वरित 77 जागांपैकी 36 जागा जो कोणी जिंकेल त्याचा महापौर होईल.
राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 झाले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने कारवाई झाल्यास आणखी चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे संख्याबळ 38 वर येईल. याच कारणास्तव भाजपच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक 32 होतील. जर जात पडताळणी प्रमाणपत्रावरून नगरसेवकांवर कारवाई झालीच नाही, तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात तब्बल नऊ नगरसेवकांचा फरक असेल.
संबंधित बातम्या
बंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर
नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं