यवतमाळ: तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात अखेर दीड महिन्यांनी यश आलं आहे. शार्प शूटर अजगर अलीने टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.
या वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र वाघिणीने आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला केल्याने, शार्प शूटर अजगर अलीने नेम धरला आणि वाघिणीला अचूक टिपला. या झटापटीसह गेल्या 47 दिवसांपासून सुरु असलेला धरपकडीचा थरार थांबला. मध्यरात्री 1 च्या सुमारास ही चकमक झडली.
काल रात्री टी-1 वाघिणीचा शोध सुरु असताना ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केल्यानं शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला.
13 जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करा असा थेट आदेश सर्वोच्च न्यायालायने 11 सप्टेंबरला दिला होता. मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला होता. त्यानंतर या वाघिणीला ठार करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग तयारी केली होती.
वाघिणीला ठार करण्यासाठी काय काय केलं?
या वाघिणीला ठार करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली होती. या वाघिणीच्या शोधासाठी पाच हत्ती आणले होते. यामध्ये पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा, हे मध्य प्रदेशच्या कान्हा जंगलात वास्तव्याला असणारे चौघे भाऊ आणि गजराज हा ताडोबाच्या जंगलातील हत्ती होता.
यापैकी एका हत्तीने साखळी तोडून हैदोस घातला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.
याशिवाय जेरबंद करण्यासाठी जे पॉवर पॅरा मोटर आणि दोन इटालियन श्वान आणले होते. मात्र या वाघिणीला ठार करण्यात शूटर अजगर अलीला यश आलं.
या मिशननंतर वाघिणीचा मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला. टी-1 वाघिणीचे 2 बछडे आहेत. त्यांचं वय 11 महिने इतकं आहे. त्यांना शोधण्याचं आव्हान आता वन विभागासमोर आहे.