मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी आणि ओबीसी समाजाला योग्य न्याय देणार असे कालच (8 नोव्हेंबर) सांगितले आहे. त्यातच आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे. (MLA Sanjay Shinde demanded Maratha reservation to be given from the OBC community)
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. तर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसला तरी त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. अशातच करमाळाचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजयमामा शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिले आहे.
…तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार
तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला ओबीसी समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
“आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. उद्या आम्ही गोलमेज परिषद घेणार आहोत. या परिषदेत मी अनेक बाबींचा खुलासा करणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरु” असं ते म्हणाले. तसेच, राष्ट्रवादीचे नेते ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत का? असा सवाल करत राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच पेटला आहे. आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने रविवारी (8 नोव्हेंबर) पंढरपूर ते मंत्रालय अशी पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे सांगितले.
संबंधित बातम्या :
Sambhaji Raje | नांदेडमध्ये मराठा आरक्षण एल्गार मेळावा, खासदार संभाजीराजे
ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या : अनिल परब
शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही? : संभाजीराजे
(MLA Sanjay Shinde demanded Maratha reservation to be given from the OBC community)