मुंबई : मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याची घोषणा केली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी ‘आरे लढा’ यशस्वी झाल्याचं सांगत राज्य सरकारचे तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. (MNS Amit Thackeray Facebook Post On Cm Uddhav Thackeray Decision Aarey)
सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, अशी फेसबुक पोस्ट करत ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचे अमित ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
अमित ठाकरे म्हणाले, “आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम”.
मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कांजूरमार्गच्या जागेसाठी एका नव्या पैशाचाही खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. तसेच आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आरेतील झाडे वाचवण्यासाठी अमित ठाकरे उतरले होते मैदानात
मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत एका रात्रीत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडून टाकली होती. त्यामुळे आरे आंदोलन आणखीनच चिघळले होते. त्यावेळी मनसेने पर्यावरणवाद्यांची बाजू लावून धरली होती. तसंच पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेसोबत आपण राहू, असं मनसेने जाहीर केलं होतं.
पर्यावरणवाद्यांवरचे गुन्हे मागे- मुख्यमंत्री
आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले.
आरेतील जंगलाचे क्षेत्र 600 एकरावरून 800 एकरापर्यंत वाढवण्यात आले आहे. आपण आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल. मात्र, यामुळे आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकार जनतेचा एकही पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
(MNS Amit Thackeray Facebook Post On Cm Uddhav Thackeray Decision Aarey)
संबंधित बातम्या
‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात अमित ठाकरेही मैदानात
निवडून आल्यावर गवत लावून ‘आरे’ला जंगल घोषित करणार का? : राज ठाकरे