मुंबई : महाराष्ट्रात जवळपास साडेचार महिने जिम बंद असल्याने व्यायामप्रेमी आणि जिम व्यावसायिकांचा रोष वाढत आहे. ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी दिला. (MNS Raj Thackeray appeals Trainers Owners to open Gym)
“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय” असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले.
“किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या” असे आवाहन राज यांनी केले.
“मी टेनिस खेळायला सुरुवात केली”
“गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स काय असू शकतो? मधू इथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होतंय बघूया.. माझं तुम्हाला म्हणणं आहे काय कारवाई करणार? मार्केट सुरु आहेत सगळे. हा सगळा मूर्खाचा बाजार सुरु आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुरु आहेत.” असे राज ठाकरे म्हणाले.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला.
“पहिलं मला सांगा, जिम सुरु केल्यानंतर काळजी कशी घेणार?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारल्यानंतर जिम मालकांनी “कार्डिओ बंद करणार, सॅनिटायझेशन, एक तासाची एक बॅच अशा पद्धतीने सुरु करणार” असे सांगितले.
जिम व्यावसायिक, जिम ट्रेनर, बॉडीबिल्डर आणि सर्वसामान्य व्यायामप्रेमी नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’बाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती. नेहमी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात दिसणाऱ्या व्यायामप्रेमींनी ‘कृष्णकुंज’बाहेर फलक घेऊन सरकारला प्रश्न विचारले.
लॉकडाऊनच्या काळात जिम अनेक दिवस बंद आहे. सरकार जिम सुरु करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे मनसेने हा मुद्दा सरकारकडे मांडावा, या मागणीसाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
पहा व्हिडीओ :