निवृत्ती बाबर , टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावर जागे होता. निवडणूक आयोगावरच कडक कारवाई केली पाहिजे अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोग 5 वर्ष कायं करतं, असा परखड सवालही त्यांनी या वेळी विचारला. शिक्षकांना शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली आहे. मात्र यामध्ये त्या लहान मुलांचा दोष काय, त्यांना कोण शिकवणार असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारलं.
शारदाश्रम शाळेच्या काही पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यांच्या शाळेला नोटीस आली. पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पालिका, निवडणूक आयोग आणि सरकारने बोलावलं. हे शिक्षक घेतल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण याची काही माहिती नाही. या मुद्यावर बोलत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला कारभाराबद्दल फटकारलं.
मुंबई महापालिकेच्या ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येतं. एवढे शिक्षक बाहेर काढले तर मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतं?असा सवाल त्यांनी विचारला. निवडणूक आल्यावर असल्या गोष्टी घाईगडबडीत करत असाल तर आयोग काय करतं. पाच वर्ष काय करतं. आयत्यावेळी शाळांवर दडपण का आणतं,असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. दर पाच वर्षाने निवडणुका येतात त्यावेळी तुमची यंत्रणा सज्ज का ठेवत नाही. त्या विद्यार्थ्यांचा काय दोष ? शिक्षक हे काय निवडणुकीचं काम करण्यासाठी आले का?, अशा शब्दात राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले.