यवतमाळ: यवतमाळमध्ये 11 जानेवारीपासून सुरु होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा मनसेने दिला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिका आणि लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते हा मराठी सारस्वतांचा अपमान आहे, तो खपवून घेतला जाणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.
मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला.
यंदा मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होत आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये सारस्वतांचा मेळा भरेल अशी आशा आहे. पण त्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. साहित्य संमेलनात अमराठी साहित्यिकांना निमंत्रण दिल्याने त्याला आक्षेप घेतला जात आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिक का? असा सवाल मनेसेने विचारला आहे.