कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं

| Updated on: Dec 04, 2020 | 4:33 PM

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर मोदी सरकारने नाराजी व्यक्त करत कॅनडाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचं म्हटलं.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं
Follow us on

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justine Trudeau) यांनी भारतातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत काळजी व्यक्त केली. यानंतर आता मोदी सरकारने जस्टिन ट्रूडो यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत कॅनडाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचं म्हटलं. जस्टिन ट्रूडो यांनी आमचा शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाचे (Canada) पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच भारताच्या अंतर्गत विषयांमधील कॅनडाचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही, असं सांगितलं (Modi Government angry on Canada PM Justin Trudeau for supporting Farmer Protest in India).

मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (4 डिसेंबर) आपली भूमिका स्पष्ट करत कॅनडातील नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो नेमकं काय म्हणाले होते?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

ते म्हणाले होते, “आम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत आहोत. या शेतकऱ्यांविषयी आम्हाला काळजी वाटत आहे. आपल्या अधिकारांसाठी शांततापूर्ण आंदोलनात कॅनडा नेहमीच तुमच्यासोबत आहे. आमचा चर्चेवर/संवादावर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांची बाजून भारतीय अधिकाऱ्यांसमोर ठेऊ. आपण सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.”

भारतीयवंशाचे कॅनडाचे खासदार रुबी सहोटा आणि टिम उप्पल यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारतातील शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी होत असल्याचं चित्र आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्यासह कॅनडातील भारतीयवंशाच्या काही खासदारांनीही शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिलाय. तसेच मोदी सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळत आहे त्यावर नाराजी व्यक्त केलीय.

कॅनडातील भारताच्या दुतावासाबाहेर आंदोलन

याशिवाय तेथील भारतीयवंशाच्या नागरिकांनी कॅनडातील भारताच्या दुतावासाबाहेर आंदोलन करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला आहे. त्यामुळे मोदी सरकारने कॅनडाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारतातील कॅनडाच्या राजदुताला पाचारण केलं आहे. त्यांच्याकडे भारत आपली तीव्र नाराजी व्यक्त करेल.

मोदी सरकारची भूमिका काय?

मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, “शेतकरी आंदोलनावर कॅनडाच्या अनेक नेत्यांनी भाष्य केलं आहे. मात्र, आम्हाला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप मान्य नाही. जर अशाप्रकारची वक्तव्ये यानंतरही सुरुच राहिली तर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर याचा दुष्परिणाम होईल. कॅनडातील भारताच्या दूतावासाबाहेर आंदोलनकर्त्यांचं जमा होणं सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आहे. कॅनडाच्या प्रशासनाने यावर कारवाई करायला हवी.”

हेही वाचा :

Farmers Delhi protest | काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन, तर साहित्य संमेलनाध्यक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

महाराष्ट्र दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी, राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा एल्गार

पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा, ट्विटरकडून अमित मालवीय यांचं ट्विट ‘फ्लॅग’

Modi Government angry on Canada PM Justin Trudeau for supporting Farmer Protest in India