पॅरिस : फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Paris) यांनी भारतीय समुदायालाही संबोधित केलं. यावेळी त्यांनी (PM Modi Paris) फ्रान्स आणि भारताच्या संस्कृतीक संबंधांवर प्रकाश टाकला. मोदींच्या भाषणावेळी भारतीय समुदायाने ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) च्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात हजारो भारतीय हातात तिरंगा घेऊन आले होते. निवडणुकीतील यशानंतर मोदींच्या हा पहिलाच दौरा असल्यामुळे भारतीय समुदायामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
फ्रान्समध्ये 1950 आणि 1966 मध्ये दोन वेगवेगळ्या विमान दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या भारतीयांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा यांचाही यामध्ये मृत्यू झाला होता. होमी भाभा यांच्या कार्यालाही मोदींनी सलाम केला.
भारत सध्या वेगाने विकास करत असल्याचं मोदींनी सांगितलं. शिवाय आम्हाला मिळालेला कौल हा सरकार चालवण्यासाठी नव्हे, तर नवीन भारताची बांधणी करण्यासाठी आहे, असं ते म्हणाले. मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं, की भारत आता वेगाने पुढे जात आहे. आम्हाला मिळालेला जनतेचा कौल हा फक्त सरकार चालवण्यासाठी नाही, तर नवीन भारताची बांधणी करण्यासाठी आहे, असं मोदींनी भारतीय समुदायाला सांगितलं.
मी सध्या फुटबॉलप्रेमी देशात आहे, जिथे गोलचं महत्त्व सर्वांनाच कळतं, जी एक महत्त्वाची कामगिरी आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही असे गोल निश्चित केले, जे यापूर्वी कधीच पूर्ण झाले नव्हते, असंही मोदी म्हणाले. यावेळचा फुटबॉल फ्रान्सने जिंकला, भारतानेही त्याचं सेलिब्रेशन केलं, असं मोदींनी सांगितलं.
नवीन भारतात भ्रष्टाचार, घराणेशाही, गरीबांचे पैसे लुटणे, दहशतवाद याविरोधात ज्या प्रकारचं काम गेल्या पाच वर्षात झालं, ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं. नवीन सरकार येऊन 75 दिवस झालेत, त्यातच आम्ही अत्यंत कठोर निर्णय घेतले, अशी माहितीही मोदींनी दिली.
आपण आज 21 व्या शतकात INFRA (पायाभूत सुविधा) बद्दल बोलतो. मला सांगायला आवडेल, की हा शब्द माझ्यासाठी IN+FRA म्हणजेच भारत आणि फ्रान्स असा आहे, असं म्हणत मोदींनी फ्रान्स आणि भारताच्या संबंधांचं महत्त्वही अधोरेखित केलं.
पॅरिसमध्ये गणेश महोत्सव एक महत्त्वाचा भाग बनलाय असं मला सांगण्यात आलं. सध्या पॅरिस मिनी इंडिया दिसत आहे. म्हणजेच येत्या काही दिवसात इथेही आपल्याला गणपती बप्पा मोरया ऐकायला मिळेल यात शंका नाही, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि बहरेनच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय समुदायाला संबोधित केल्यानंतर मोदी अबुधाबूसाठी रवाना झाले. यानंतर ते पुन्हा फ्रान्सला परतणार आहेत. पॅरिसमध्ये जी-7 देशांच्या बैठकीसाठी ते हजेरी लावतील.
संबंधित बातमी – तिसऱ्या देशाची लुडबूड नको, काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ