नवी दिल्ली : देशात सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या उत्सवाला सुरुवात झालीय. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रचारसभा, मेळावे यांच्यासोबत आणखी एका नव्या तंत्राची भर पडली आहे ते म्हणजे सोशल मिडिया. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, इंफ्लूएन्सेर्स, युट्यूब, फेसबुक, X यासारख्या सोशल माध्यमांवर राजकीय पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. तरुण वर्गाला किंवा सोशल माध्यमावर असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वर्गाला आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता सोशल माध्यमाचा वापर सुरु केला आहे.
सोशल मिडियाचे महत्व ओळखून भाजपने ‘माय फर्स्ट व्होट फॉर मोदी’ हे संकेतस्थळ सुरू केले. तर, दुसरीकडे कॉंग्रेसने ‘राहुल गांधी व्हाट्सअप समूह’ तयार केला आहे. भाजपच्या या संकेत स्थळावर मतदार मतदानाचा संकल्प करून आपला व्हिडिओ अपलोड करू शकतात. तसेच, यावर एनडीए सरकारच्या विकासकामांचे लहान व्हिडिओदेखील अपलोड करण्यात आले आहेत. तर, काँग्रेसच्या व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून राहुल गांधी थेट लोकांसोबत संवाद साधत आहेत. लोकांच्या प्रश्नानंही ते उत्तर देतात. त्यांनी दिलेल्या उत्तरांची माहिती अधिक जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी कॉंग्रेसने जिल्हास्तरावर निरीक्षक नेमले आहेत.
भारतामध्ये 50 कोटी हून अधिक जनता whatsapp चा वापर करत आहे. त्यामुळे जनतेसोबत संवाद साधण्याचे whatsapp हे उत्तम साधन मानले जाते. सरासरी दोन लाख लोकसंख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रामध्ये 40% इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे एकाचवेळी किमान 80 हजार लोकांपर्यंत नेमका संदेश पोहोचत असल्याने या माध्यमाचा उमेदवार अधिकाधिक वापर करत आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक, बल्क एसएमएस, केबल वेबसाईट यांच्यावरील जाहिरातीसाठी भाजपने 325 कोटी इतका खर्च केला होता. तर, काँग्रेसने 356 कोटी रुपये उधळले होते. त्यामुळे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचे नियमन करण्यासाठी आयोगाने संबंधित कंपन्यांसोबत चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
एकेकाळी सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांची फेसबुक ही सर्वाधिक पसंती होती. परंतु, फेसबुकवर अनेक निर्बंध आले. त्यामुळे आता whatsapp, इंस्टाग्राम आणि ट्वीटर (X) यासारख्या सोशल माध्यमाचा अधिक वापर करत आहेत. प्रचारामध्ये सोशल मीडियाची ताकद ही अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपने अधिक ओळखली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाची ताकद ओळखून 2009 साली ट्वीटर account सुरु केले. त्यांचे ट्वीटरवर 9 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यामानाने उशिराने म्हणजे 2015 साली ट्वीटरवर आले. आज घडीला त्यांचे 2 कोटी 51 लाख फॉलोअर्स आहेत. ट्वीटरवर भाजपाच्या अधिकृत पेजवर 2 कोटी 16 लाख तर काँग्रेसचे 1 कोटी 3 लाख आणि आपचे 65 लाख फॉलोअर्स आहेत.