लखनौ : सर्वत्र कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. अशातच कोरोना चाचणीचा अहवाल लवकर यावा यासाठी मोठे प्रयत्न होत असतात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना चाचणीसाठी घेऊन जात असलेले नमुनेच माकडाने पळवल्याचं समोर आलं आहे (Monkey destroy corona patient sample). त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. कोरोनाची गंभीर स्थिती असताना झालेला हा प्रकार बेजबाबदारपणा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या घटनेमुळे कोरोना रुग्णांच्या नमुन्याची सुरक्षा आणि संसर्गाचा धोका असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मेरठ येथील वैद्यकीय महाविद्यालयात काही कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. त्यातील 3 कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले जात होते. हा परिसर मोठा होता. त्यामुळे रुग्ण दाखल असलेल्या इमारतीतून कोरोना प्रयोगशाळा असलेल्या इमारतीत हे नमुने नेले जात असतानाच एका माकडाने प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञावर हल्ला केला. या माकडाने त्या तंत्रज्ञाच्या हातातील चाचणीचे नमुने देखील हिसकावून घेतले. माकडाने या नमुन्यांच्या बॉटल घेऊन पुन्हा झाड गाठले आणि त्या ठिकाणी या बॉटल फोडल्या.
मेरठमधील या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात परिसरातील माकडांचा उच्छाद आणि त्यामुळे कोरोना नियंत्रणाच्या कामात होत असलेला अडथळा यावरही भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या वैद्यकीय महाविद्यालयात याआधीही माकडांचा उच्छाद सुरु असताना या घटनेआधीच यावर उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असाही प्रश्न विचारला जात आहे.
या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर फिरत आहे. यात एका माकडाच्या हातात काही नमुन्याच्या बॉटल्स दिसत आहेत. ते माकड या बॉटल दाताने फोडतानाही दिसत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचाही धोका निर्माण झाला आहे. संबंधित माकड या परिसरात इतर ठिकाणी गेल्यास या नमुन्यांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. तोंडाने या नमुन्याच्या बॉटल फोडल्याने माकडाबाबतचा संसर्गाचा धोकाही तपासला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी माकडाला ताब्यात घेतले जाणार का हेही पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
Lockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण
प्रवासी मजुरांच्या प्रश्नावरुन सुप्रीम कोर्टात खडाजंगी, तिकिटाच्या पैशावरुन युक्तीवाद
तिजोरी उघडा, गरजू कुटुंबांना दरमहा 7500 रोख द्या, सोनिया गांधींची मोदी सरकारकडे मागणी
संबंधित व्हिडीओ :