सोलापूर : मी तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळेप्रसंगी तलवार काढेन, असं वक्तव्य केलं. मात्र त्याचा काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली. तसंच मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती, असं ते म्हणाले. (Mp Sambhajiraje Criticized Vijay Wadettiwar)
तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात मराठा समाज संतापलेला होता. राजे तुम्ही आम्हाला म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश होता. मात्र जमावाला शांत करण्यासाठी तुम्हाला तलवार काढण्याची गरज नाही ,वेळेप्रसंगी मी तलवार काढेन असं म्हणालो होतो. मात्र त्याचा विपर्यास केला गेल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं.
राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारले. तसेच आता सकल मराठा समाजाचा आवाज महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
आरक्षण सोडा पण 2014 पासून आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे बाकीचे प्रश्न तरी सोडावलेत का? महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. मग त्यांना मदत का केली गेली नाही? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली? नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नाही, असा टोलाही संभाजीराजे यांनी सरकारला लगावला.
तसेच मला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे. गेल्या सरकारच्या काळापासून मी याच गोष्टी बोलत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
तत्पूर्वी सोलापुरातील आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या आंदोलकांकडून उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली. (Mp Sambhajiraje Criticized Vijay Wadettiwar)
संबंधित बातम्या
नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे
राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल