मुंबई : “मराठा समाजाला EWS नुसार लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला गेला आहे. EWS मध्ये 10 टक्क्यात मराठा समाजाला समाविष्ट करणार नाही”, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला आहे, असं राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं. (MP Sambhajiraje Meet Cm Uddhav Thackeray over Maratha Reservation)
खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपली. EWS आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसंच मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
“EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. EWSमध्ये आम्हाला तात्पुरतं आरक्षण नको, असं सांगत त्याचे तोटे आम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे तात्काळ आदेश दिले”, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
“मेगाभरतीबाबत सरकारने गडबग करू नये, आमची सुरूवातीपासून हीच भूमिका होती, असं सांगताना आजच्या बैठकीत मेगाभरतीबाबत चर्चा झाली नाही”, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.
सरकारने जर मेगाभरतीचा निर्णय लगोलग घेतला तर मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होईल, असं मत संभाजीराजेंनी मांडलं. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत राज्य सरकार तर्फे शिक्षणासाठी सुपर न्यूमररी अंतर्गत 12 टक्के आरक्षण दयावं, अशी मागणी देखील आम्ही केली. त्यावरही राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली, असा तपशीलही संभाजीराजेंनी दिला.
“सुप्रीम कोर्टामधली मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र या गोष्टीने आम्ही खूश आहोत, याचा अर्थ असा होत नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढत राहू”, असं ते म्हणाले.
“ओ.बी.सी. समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला आरक्षण नको. हा समाजाचा विषय आहे म्हणून सर्वपक्षीय खासदारांना लेटर दिलं आहे”, असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.
शरद पवार यांना संभाजीराजेंचं उत्तर
“दोन छत्रपती भाजपकडून राज्यसभेवर गेले आहेत. त्यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत”, असं शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेवर म्हणाले होते. त्यावर, “शरद पवार यांच्या बोलण्यावर मला काही बोलायचं नाही. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात एकाही खासदाराने मराठा समाजाच्या बाजूने किंवा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका घेतली नव्हती. घेतली असेल तर एकमेव छत्रपती संभाजीराजेंनी घेतली तसंच संसदेतल्या गांधी पुतळ्यासमोर मराठा मोर्चे चालू असताना आंदोलन देखील केलं”, असं संभाजीराजे म्हणाले.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द
गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली