नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेत खासदारांची बसण्याची जागा (mp seating allotment) निश्चित झाली आहे. आतापर्यंत खासदारांची जागा निश्चित नव्हती. यामुळे संसदीय कामकाज आटोपण्यासाठीही अडथळे येत होते. लोकसभा सचिवालयाकडून नवी बैठक व्यवस्था (mp seating allotment) जारी करण्यात आली आहे. पहिल्या रांगेत बसणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या यादीत काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश झालाय. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केलेल्या स्मृती इराणी यांना पहिल्या रांगेत स्थान मिळालंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाचे नेते असल्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाची जागा मिळाली आहे. पहिल्या क्रमांकाची जागा ही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या समोर उजव्या बाजूला असते. पंतप्रधान मोदींच्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील. तिसऱ्या क्रमांकाची जागा गृहमंत्री अमित शाह यांना देण्यात आली आहे. या जागेवर 16 व्या लोकसभेत तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बसत होत्या.
चौथ्या क्रमांकाची जागा दळणवळण मंत्री नितीन गडकरी, तर पाचवी आणि सहावी जागा अनुक्रमे सदानंद गौडा आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना मिळाली आहे. अगोदर चौथ्या क्रमांकावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी बसायचे. क्रमांक 1 ते 6 या पहिल्या रांगेतील जागा असतात. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, स्मृती इराणी आणि अर्जुन मुंडा यांनाही पुढची जागा मिळाली आहे. तर एनडीएतील मित्रपक्ष शिवसेना आणि जेडीयूलाही पुढचं स्थान देण्यात आलंय.
विरोधी पक्षांना दिल्या जाणाऱ्या जागांबाबत मोठी उत्सुकता होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागेचा वादही समोर आला होता. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी पहिल्या रांगेतील जागा मागितली असल्याचंही बोललं जात होतं. पण दोघांनाही गेल्या लोकसभेला असलेल्याच जागा पुन्हा देण्यात आल्या आहेत.
सोनिया गांधी विरोधकांच्या बाकावरील पहिल्या रांगेत 457 सीट क्रमांकावर बसतील, तर राहुल गांधी दुसऱ्या रांगेत सीट क्रमांक 466 वर बसतील. लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना 458 व्या क्रमांकाचं सीट देण्यात आलंय.
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना एकदम पुढची जागा देण्यात आली आहे. तर त्यांचे खासदार चिरंजीव अखिलेश यादव यांना दुसऱ्या रांगेत जागा मिळाली आहे. सोनिया गांधी आणि मुलायम यांच्या मध्ये डीएमके नेते टी. आर. बालू यांना जागा मिळाली आहे. तर लोकसभा उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
लोकसभेच्या नव्या उपाध्यक्षाची अजून नियुक्ती झालेली नाही. विरोधकांपैकी बीजेडीचे नेते पिनाकी मिश्रा आणि टीएमसीचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना पुढच्या रांगेत जागा मिळाली आहे.