राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची मोठी बातमी… विधानपरिषदेसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही यादी केंद्राकडे पाठवली असल्याची देखील माहिती आहे. अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे या नेत्यांच्या नावाचा भाजपच्या विधान परिषदेच्या यादीत समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. या यादीत दोन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ या दोन महिला नेत्यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
1) पंकजा मुंडे
2) हर्षवर्धन पाटील
3) रावसाहेब दानवे
4) चित्रा वाघ
5) अमित गोरखे
6) परिणय फुके
7) सुधाकर कोहळे
8) योगेश टिळेकर
9) निलय नाईक
10) माधवी नाईक
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यंदा लोकसभेच्या रिंगणात होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. तर पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. अशातच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. चित्रा वाघ यांचंही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे. भाजपने त्यांचंही नाव केंद्रात पाठवल्याची माहिती आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. 1999 पासून खासदार असेल्या रावसाहेब दानवे यांचा जालन्यात दारूण पराभव झाला. त्यानंतर रावसाहेब दानवे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.