मुंबई : अभिनेता आदित्य पंचोली आणि अभिनेत्री कंगना राणावतचा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई हायकोर्टाने अब्रू नुकसानीच्या प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली राणावतला समन्स जारी केला आहे. आदित्यचे वकील श्रेया श्रीवास्तव म्हणाल्या, चार समन्स देण्यात आलेले आहेत. एक आदित्य पंचोली विरुद्ध कंगना राणावत, दुसरा आदित्य पंचोली विरुद्ध रंगोली चंदेल आणि जरीना वहाब विरुद्ध कंगना राणावत आणि जरीना वहाब विरुद्ध रंगोली चंदेल.
या प्रकरणात पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे. त्यावेळी अभिनेत्रीला उपस्थित रहावे लागणार आहे. नुकतेच आदित्यची पत्नी जरीना आपल्या पतीच्या बचावासाठी उतरली आहे. जरीना म्हणाली, “मी इतरांपेक्षा माझ्या पतीला चांगले ओळखते. माझ्यापासून ते काही लपवत नाहीत. मला माहित आहे मागे काय झाले होते. ते त्यांनी काही चुकीचे काम केले नाही”.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कंगनाने आदित्य पंचोलीवर शारिरीक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता. यानंतर 2017 मध्ये आदित्यने कंगनावर अब्रूनुकसानीची याचिका कोर्टात दाखल केली. सुनावणी दरम्यान कोर्टात हजर न राहिल्यामुळे दोघांनाही कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला. आदित्यने काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्येही कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
आदित्यचे नाव न घेता रिलेशनशिपबद्दल कंगनाने म्हटले होते की, “आम्ही पती-पत्नीप्रमाणे रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही दोघं आमच्यासाठी यारी रोडवर घरही खरेदी करण्याचा प्लान करत होतो. आम्ही एका मित्राच्या घरी तीन वर्ष एकत्र राहिलो होतो. मी जो फोन वापरते, तो फोनही आदित्यचा आहे”.
तो व्यक्ती माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्याने माझ्या डोक्याला खूप मोठी जखम दिली होती, तेव्हा माझे वय 17 वर्ष होते. माझ्या डोक्यातून रक्त येत होते. मी माझी सँडल काढत त्याच्या डोक्यावर मारली. त्याच्या डोक्यातूनही रक्त येऊ लागले. मी त्याच्या विरोधात तक्रारही केली होती, असं कंगनाने सांगितले होते.