मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. सतीश नरोडे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते. या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं.
दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश नरोडे या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच येत्या काही दिवसात कमेंट करणाऱ्या लोकांना अटक करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. “राज ठाकरेंनी स्वतःहून बोलवले आणि माझ्या धाडसाचे अभिनंदन केले. महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाव मिळाला. त्यासाठी राज ठाकरेंनी माझे अभिनंदन केले”, अशी माहिती केतकी चितळेने दिली होती. त्याशिवाय तिने मंगळवारी (18 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हवरुन गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तिने हिंदीत संवाद साधला होता. मात्र त्यापूर्वी तिने आपण हिंदी का बोलणार आहोत हे सांगितलं होतं. तसंच मी मराठी आहे म्हणून मराठीच बोलायला हवं असा सल्ला देऊ नका, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, असंही केतकीने म्हटलं होतं. मात्र तिच्या फेसबुक लाईव्हदरम्यान अनेकांनी अश्लिल कमेंट केल्या होत्या. अनेकांनी बलात्काराचीही धमकी दिली.
ट्रोलर्सच्या या कमेंटसना केतकीने पुन्हा फेसबुक लाईव्ह करुन उत्तर दिलं होतं. ती म्हणाली, “मी एका व्हिडीओत मराठीविषयी बोलले नाही. जाहीर प्रेम दाखवले नाही, मी मराठी, मी मराठीचा बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाही तर माझी मातृ आणि पितृ भाषा मोडकळीला लागेल, एवढी ती तकलादू नाही. मला माझ्या भाषेवर प्रेम दाखवावे लागत नाही. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एकाच स्त्रीचा निषेध करायला तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करावी लागते, शिवीगाळ करावी लागते, तिचा बलात्कार करावा लागतो, असा महाराष्ट्र माझा नाही”
आधीच्या व्हिडीओत काय म्हणाली होती?
केतकीने आपल्या आधीच्या व्हिडीओत म्हटले होते, “मी माझ्या मराठी बांधवांना सुरुवातीलाच सांगू इच्छिते की मला फक्त मराठी भाषिक लोक फॉलो करत नाही, तर इतर भाषिक लोकही फॉलो करतात. त्यामुळे आजचा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल. त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवून नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. कमीतकमी ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. म्हणून कृपया कमेंटमध्ये मराठी विसलीस का? असे म्हणू नका, असे तिने म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
रेपची धमकी देणारा महाराष्ट्र माझा असू शकत नाही, ट्रोलर्सना केतकी चितळेची सडेतोड उत्तरं
ट्रोलिंग प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला