नागपूर : उघड्यावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या खुद्द नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच मुसक्या आवळल्या. कार्यालयात येताना महापालिका मार्गालगत असलेल्या नाल्यात मूत्रविसर्जन करणाऱ्या व्यक्तीला पकडून मुंढेंनी स्वतःच मनपा कार्यालयात नेलं. ‘उपद्रवी’ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करत तुकाराम मुंढेंनी आठवड्याचा श्रीगणेशा केला. (Nagpur Tukaram Mundhe Action)
तुकाराम मुंढे नेहमीप्रमाणे आज (सोमवार 2 मार्च) सकाळी कार्यालयात येत होते. पारशी बंगल्यापुढे असलेल्या ‘पूनम प्लाझा’मार्गे महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नाल्यावर मुंढेंना एक व्यक्ती लघुशंका करताना दिसली. त्यासरशी आयुक्तांनी त्याला पकडून महापालिका कार्यालयात हजर केलं.
तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे त्या व्यक्तीकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. संबंधित व्यक्ती जिल्हा न्याय मंदिर येथे चपराशी पदावर कार्यरत आहेत. या कारवाई संदर्भात महानगरपालिकेतर्फे जिल्हा न्यायालयाला पत्र पाठवण्यात येणार आहे.
आपल्या शहराची स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी करणे या वाईट सवयी टाळा. प्रसाधनगृहांचा वापर करा, उघड्यावर लघवी करताना आढळल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाईल, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
नव्या वर्षात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 443 उपद्रवींवर कारवाई
शहरात अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणाऱ्या उपद्रवींवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नियमित कारवाई होते. नव्या वर्षातही उपद्रव शोध पथकाच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांतच सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणाऱ्या 443 उपद्रवींवर पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात 249 उपद्रवींवर कारवाई करुन 1 लाख 24 हजार 500 रुपये तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 194 उपद्रवींवरील कारवाईतून 97 हजार रुपये असा एकूण दोन लाख 21 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (Nagpur Tukaram Mundhe Action)
तुकाराम मुंढेंनी महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यापासूनच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. एक महिन्यात तुकाराम मुंढेंनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. कर्मचारी वेळेत कार्यालयात येऊ लागले, कामं वेळेवर होऊ लागली, कर्मचाऱ्यांना शिस्तही लागली. आता नियम मोडणाऱ्या नागरिकांनाही सुतासारखं सरळ करण्याचा चंग मुंढेंनी बांधल्याचं दिसत आहे.