नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात बँडवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. याचाच विचार करुन नागपूर पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता नागपूर शहरात 3 महिन्यानंतर ‘बँड बाजा बारात’ पहायला मिळणार आहे. बँडवाल्यांचं आर्थिक संकट पाहून नागपूर पोलीस आयुक्त भुषणकुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतला (Nagpur police permit Bandbaja in wedding). त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ बोलताना ही माहिती दिली.
नागपूरमध्ये लग्नाला आणि त्यात बँडवाल्यांना परवानगी दिली असली, तरी आवश्यक निर्बंधही लावण्यात आले आहेत. लग्नात केवळ 50 पाहुण्यांना आमंत्रित करता येणार आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी देखील फिजीकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचं कटोर पालन करावं लागणार आहे. वर किंवा वधू पित्याला लग्नासाठी समारंभात बँडवाल्यांना बोलावता येणार आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बँडवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या बँड कारागीरांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. म्हणूनच सरकारनं घालून दिलेल्या 50 पाहूण्यांच्या अटीचं पालन करत वधू किंवा वर पित्याला लग्न समारंभात बँडपथकाला बोलावता येणार आहे. पण त्यातंही सोशल
डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये काल (सोमवार, 15 जून) 60 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यासह नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 65 वर पोहचली आहे. जिल्ह्यात 3 दिवसांमध्ये 102 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. नागपुरात काल कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपूरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरातील कोविड रुग्णालयातून काल 33 जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं डिस्चार्ज करण्यात आलं. नागपुरात आतापर्यंत 648 जण कोरोनामुक्त झालेत.
ऑनलाईन शिक्षण थांबवा, नागपूर विभाग शिक्षण उपसंचालकांचे आदेश
नागपूर विभागात काही शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरु केले होते. मात्र, आता शाळांनी सुरु केलेले ऑनलाईन शिक्षण तात्काळ थांबवण्याचे आदेश नागपूर विभाग शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. ऑनलाईन क्लासेसबाबत सरकारकडून निर्देश नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा :
पुण्यातील सर्व उद्यानं बंद होणार, महापौरांच्या पालिका प्रशासनाला सूचना
औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस
Cyclone Nisarga | केंद्रीय पथक रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी
Nagpur police permit Bandbaja in wedding