बीड : मुलीला गर्भातच मारणारा जिल्हा अशी एकेकाळी बीडची ओळख होती. पण ही ओळख आता पुसली असून या जिल्ह्यात मुलींचं कसं स्वागत केलं जातंय त्याची प्रचिती एका कार्यक्रमातून आली. मुलींबद्दल भेदभाव नको म्हणून बीडच्या स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या वतीने बीडमध्ये आज 501 कन्यारत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा पार पाडण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. गत वर्षी 301 कन्यारत्नांचे सामुदायिक नामकरण सोहळा पार पाडण्यात आला होता. त्यावेळी वंडर बूक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली होती. यंदा 501 कन्यारत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या महाउपक्रमाची वाटचाल लिम्का बूककडे होत आहे. पुढील वर्षी 701 कन्यारत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी सांगितलं.
501 कन्यारत्नांचा सामुदायिक नामकरण करण्याचा हा उपक्रम देशातील पहिलाच आहे. सामुदायिक नामकरण सोहळ्यामुळे बीड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदारात थोडी फार सुधारणा देखील झाली असून मुलींच्या जन्माचेही मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे मातांचा उत्साह मात्र वाढलेला दिसून आला. असे उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
या सोहळ्याला बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनीही हजेरी लावली. प्रितम मुंडे यांनी लहान मुलींना हातावरती घेऊन अंगाई गीतंही गायली. लेकीची मावशी म्हणून प्रितम मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. एकेकाळी बीड जिल्हा स्त्री भ्रूणहत्येचा जिल्हा म्हणून समजला जायचा. मात्र आता हा कलंक पुसला गेलाय. जिल्ह्यात नवीन परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा मला अभिमान असल्याचं खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या.