पंढरपूर: कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर असं दोन दिवसांचंच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय. नाना पटोले आज पंढरपूरमध्ये आहेत.(Nana Patole is also upset over the two-day winter session of Legislature)
कोरोना महामारीमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचा वेळ कमी केल्याचं आपल्याला मान्य नसल्याचं नाना पटोले म्हणालेत. विधानसभेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पडावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले हे आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. “अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हे लोकशाहीला धरुन असल्याचं मान्य करता येणार नाही. कोरोनामुळे सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य अधिवेशनात आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्यानं आमदारांवरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणं लोकशाहीला पोषक नाही”, असंही म्हणाले.
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. अतिवृष्टीमुळं पिकांचं आणि शेतजमिनीचं आतोनात नुकसान झालं आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक, अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी किमान दोन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नाही”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी प्रकट केल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. 2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
पंढरपूर हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे. पंढरपूरच्या विकासासंदर्भात लवकरच माझ्या दालनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त लावण्यात आलेल्या संचारबंदीबाबत आपण माहिती घेऊ. चुकीच्या पद्धतीनं संचारबंदी लागू केली असेल तर चौकशी करण्याचं आश्वासनही पटोले यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या:
दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला
Nana Patole is also upset over the two-day winter session of Legislature