शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीतील उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपची नाराजी आहे. महायुतीचे दिवस भरले आहेत. पापाचा अंत कुठेतरी होते आणि त्याचा अंत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आली आहे, असं बी. डी. चव्हाण म्हणाले. वंचित कडून हिंगोली लोकसभेसाठी डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड येथील बी. डी. चव्हाण यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंगोलीची जागा वंचित बहुजन आघाडी जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार दिला आहे. त्यावर बी. डी. चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी जन मोर्चाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे बोलणं सुरू आहे. हिंगोली लोकसभेला दिलेला ओबीसीचा उमेदवार प्रकाश शेंडगे मागे घेतील, असा विश्वासही बी. डी. चव्हाण यांनी व्यक्त केला.
सर्व ओबीसी, वंचित आणि पीडित घटकांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान करावं. महाराष्ट्रातील दीड करोड बंजारा समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे ऋण व्यक्त करतो. हिंगोली लोकसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं बी. डी. चव्हाण म्हणाले.
वंचित आता हिंगोली सेंटर प्लेसमध्ये आली आहे. आम्हाला जे बी टीम म्हणत होते. त्यांना आता दाखवतो ए टीम एम कोणती आणि बी टीम कोणती ते… आमची सगळ्यांना विनंती आहे. तुमचं भांडण तुमच्या जागेवर ठेवा आणि आम्हाला मदत करा. आम्हाला 1000% विजयाची खात्री आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे. पण प्रस्थापितांना आता लोक स्वीकारत नाहीत. गरीब मराठा सुद्धा वंचितला मतदान करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
3 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. डफड्याच्या तालावर मिरवणूक निघणार आहे. उमेदवारी भरायला आंबेडकरी घराण्यातील कोणीतरी यावं, असे मी प्रकाश आंबेडकरांना विनंती करणार आहे. माझ्या आयुष्यात मला इतका आनंद कधी झाला नाही. माझ्यासारख्या तांड्यातल्या माणसाला संसदेत जायचं म्हणल्यावर कोणाला आनंद वाटणार नाही? मी प्रचंड आनंदी आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो, असं डॉ. बी. डी. चव्हाण यांनी म्हटलं.