नांदेड : सुरतमध्ये शुक्रवारी (24 मे) रोजी एका कोचिंग क्लासला आग लागली होती. या आगीत 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशातील कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने नांदेडमधील कोचिंग क्लासची पाहणी केली. या पहाणीदरम्यान नांदेडमधल्या बहुतांश खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्याची सुरक्षा रामभरोसेच असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
नांदेड या शहरात सध्या 100 हून अधिक खासगी कोचिंग क्लास आहे. या कोचिंग क्लासमध्ये विदर्भ, मराठवाडयातील मेडिकल आणि इंजिनिअरींगचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या कोचिंग क्लासची फी लाखो रुपये असते. मात्र शिकवणीच्या नावाखाली लाखो रुपयांची फी उकळणाऱ्या क्लास चालकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षेवर मात्र एक रुपयाही खर्च केलेला नाही.
शुक्रवारी 24 मे रोजी गुजरातमधील सुरतमध्ये तक्षशिला आर्केड नावाच्या एका व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागली. या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एक कोचिंग क्लासला ही आग लागली होती.
या अग्नितांडवानंतर ‘टीव्ही 9 मराठी‘ने नांदेडमधील कोचिंग क्लासची पाहणी केली. या पाहणीमध्ये आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी या एकमेव क्लासेसमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेटके नियोजन आढळलं. त्याशिवाय या क्लासच्या इमारतीत फायर ऑडीटसह अग्नि प्रतिबंधकासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे खासगी कोचिंग क्लासेसची ही एकमेव ‘व्यावसायिक’ अशी इमारत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याचं स्पष्ट झालं.
मात्र हा अपवाद सोडला तर नांदेडमध्ये अन्य क्लासमध्ये विद्यार्थ्याचे जीव धोक्यात असल्याचं दिसून आलं. नांदेडमध्ये सर्रास सुरु असलेल्या कोचिंग क्लासमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्याशिवाय समजा अचानक आग लागली, तर विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर पडण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे आग लागल्यानंतर ती तात्काळ विझवण्यासाठी मुबलक पाण्याचीही व्यवस्था या कोचिंग क्लासमध्ये नव्हती.
खासगी क्लासेस चालवण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं अनिवार्य आहे. मात्र महापालिकेने या क्लासेसची पाहणी न करताच त्यांना परवानगी दिल्याचं ‘टीव्ही 9 मराठी‘च्या पाहणीत उघडकीस आलं. त्यामुळे दुर्दैवाने गुजरातप्रमाणे भयानक अग्नीतांडव नांदेडमध्ये घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतं आहेत.
दरम्यान गुजरातच्या घटनेनंतर झोपलेलं प्रशासन आता जाग झालं असून खासगी क्लासेस च्या इमारतीची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही तपासणी केवळ कागदोपत्री राहू नये तर विद्यार्थ्याच्या जीवाची काळजी घेणारी ठरावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.