मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयाची बदमाशी

| Updated on: May 20, 2021 | 11:38 AM

रुग्णाचा मृत्यू होऊन 3 दिवस ऊलटले तरी पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded Godavari Hospital)

मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयाची बदमाशी
गोदावरी हॉस्पिटल
Follow us on

नांदेड:कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू होऊन 3 दिवस ऊलटले तरी उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले.त्यावरून गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचा-यांविरोधात फसवणुकीची कलम 420 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.(Nanded District Court orders Shivajinagar Police to file case against Godavari Hospital for taking money till after three days of Ankalesh Pawar death)

प्रकरण नेमकं काय?

अंकलेश पवार यांना कोरोनाची लक्षणे असल्याने 16 एप्रिल रोजी गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल करताना 50 हजार रूपये फी अदा केली होती. त्यानंतर 20 एप्रिल रोजी तब्येत खालावल्याने अंकलेश पवार यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 21 एप्रिल रोजी रुग्णाच्या पत्नीकडून रुग्णालयाने आणखी फीची मागणी केली. तेव्हा रुग्णाची पत्नी शुभांगी यांनी 2 दिवसांचा वेळ मागितला. 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शुभांगी पवार यांनी 50 हजार रुपये ऑनलाईन आणि 40 हजार रुपये रोख भरले. त्यांनतर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रकार कधी उघडकीस आला?

शोकाकूल परिवाराने अंकलेश पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले.मात्र, 25 एप्रिल रोजी रुग्णालयाने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र पाहिले असता त्यावर 21 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता कोविड मुळे मृत्यू झाल्याचे आढळले. 21 एप्रिल रोजी मृत्यू झाला असताना उपचार सुरु असल्याचे सांगून 3 दिवस रुग्णालयाकडून पैसे घेण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर शुभांगी यांनी रुग्णालयाकडे संपर्क साधून ओरिजनल कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्यांना आणखी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा शुभांगी पवार यांचा आरोप आहे.

न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय

रुग्णालयाकडून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत शुभांगी पवार यांनी नांदेडच्या न्यायालयाकडे अ‌ॅड.शिवराज पाटील यांच्यातर्फे दाद मागितली. न्यायालयाने सर्व युक्तिवाद एकूण प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत. त्यावरून गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचा-यांविरोधात फसवणुकीचे कलम 420 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलिसांतर्फे करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद नरवटे यांनी दिली.


संबंधित बातम्या:

जैन साधूची मुंबईतील मंदिरात आत्महत्या, धर्मगुरुंनी स्वप्नात येऊन परत बोलावल्याची सुसाईड नोट

‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; 85 इंजेक्शन जप्त, 9 जणांना अटक

(Nanded District Court orders Shivajinagar Police to file case against Godavari Hospital for taking money till after three days of Ankalesh Pawar death)