नांदेड : दोन खवल्या मांजरांना 50 लाखांहून अधिक किंमतीत विकण्याचा डाव वन विभागाने उधळून लावला. शेजारील राज्यातून तस्करीच्या उद्देशाने नेले जाणारे दोन खवले मांजर वन विभागाच्या पथकाने नांदेडमधील बिलोलीत छापा मारुन हस्तगत केले. (Nanded Pangolin aka Khawalya Manjar Smuggling Caught)
खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. दुर्मिळ खवले मांजर वन्य प्राण्यामधील ‘अनुसूची क्रमांक एक’मध्ये गणले जातात. खवल्या मांजरांची शेजारील तेलंगणा राज्यातून निर्यात होत असल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती.
नांदेड येथील उप वन संरक्षण अधिकारी आशिष ठाकरे आणि सहाय्यक वन संरक्षण अधिकारी डी. एस. पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिलोली येथील देशमुख नगर भागात एका घरात छापा मारला. त्यावेळी दोन वर्ष वयाची खवल्या मांजराची मादी आणि तिचे सहा महिन्यांचे पिल्लू सापडले.
हेही वाचा : बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला
खवल्या मांजराची तस्करी करु पहाणाऱ्या सात आरोपींसह एक दुचाकी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. यावेळी भोकरचे आरएफओ आशिष हिवरे, इस्लापूरचे आरएफओ शिंदे, बोधडीचे आरएफओ श्रीकांत जाधव, हदगावचे आरएफओ रुद्रावार आणि देगलूर येथील आरएफओ एस. बी. कोळी यांनी छापा पथकात कर्तृत्व बजावले आहे.
दुर्मिळ जातीच्या खवल्या मांजराची आंतर राज्य बाजार पेठेत मोठी किंमत असल्याची माहिती पुढे येत आहे. सदर प्रकरणातील सात आरोपींविरुद्ध वन्य जीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बिलोली येथील वन विभाग कार्यालयात चालू आहे. (Nanded Pangolin aka Khawalya Manjar Smuggling Caught)