नांदेडः छत्रपती संभाजी राजे भोसले (Chatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु केले असून त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. नांदेडमध्येही (Nanded Agitation) मराठा सामाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. नांदेडमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी हैदराबाद हायवेवर टायर जाळून सरकारचा निषेध केला. मारतळा गावाजवळ आंदोलकांनी रस्त्यावर हा निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी सकाळीच हायवेवर टायर जाळल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून उद्या नांदेड बंद ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी नांदेडमधील सर्व बाजारपेठा आणि दुकाने, व्यापारी संकुल उद्या बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाला मंजुरी मिळण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले हे 26 फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजी राजे यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजी राजे भोसले यांची आझाद मैदानावर भेट घेतली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतरही ते उपोषणावर ठाम होते. दरम्यान, आज सकाळी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी होणार आहे. यावेळी छत्रपती स्ंभाजी जारे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. या बैठकीत राज्य सरकार काय प्रस्ताव देणार, राज्य सरकारची शिष्टाई परिणाम करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या-