सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे. ते अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन काय साधणार आहेत, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. (Narayan Rane take a dig at CM Uddhav)
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली होती. यानंतर ते इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यातील प्रमुख नेते अशाप्रकारे सक्रिय झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याच्या कार्यपद्धतीवर विरोधक पूर्वीपासूनच टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या कोंडीत सापडले आहेत.
याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सोलापूरचा दौरा घोषित केल्याची शक्यता आहे. ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार
(Narayan Rane take a dig at CM Uddhav)